जामखेड -जामखेड शहरातील करोनाबाधितांची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी व करोना विरोधात लढण्यासाठी तालुक्यातील सर्वच प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यासाठी आ. रोहित पवार, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि.27) आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत स्थानिक अधिकाऱ्यांना विविध सूचना करण्यात आल्या.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा आरोग्याधिकारी संदीप सांगळे, प्रांताधिकारी अर्चना नष्टे, पोलीस उपअधीक्षक संजय सावंत उपस्थित होते. यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडी यांच्या नेतृत्वाखाली हॉटस्पॉट असलेल्या जामखेडसाठी आता खबरदारीच्या उपाययोजनांसाठी विविध अधिकाऱ्यांवना जबाबदारी देण्यात आली आहे. शहरातील 21 प्रभागांमध्ये तहसीलदारांच्या सूचनेनुसार मुख्याधिकारी प्रत्येक प्रभागात दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार आहेत. त्यांच्यासोबत दोन शिक्षकही असतील. या चौघांवर एका प्रभागाची जबाबदारी देण्यात येणार आहे. ग्रामस्थांसाठी नियंत्रणकक्ष कार्यरत असून, नागरिकांनी मागणी केल्यावर त्याद्वारे सुविधा पुरवण्यात येत आहेत.
करोनाबाधितांची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी व करोना विरोधात लढण्यासाठी तालुक्यातील प्रशासनाने कंबर कसली आहे. करोनाला ब्रेक देण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रयत्न सुरू आहेत. जामखेड शहरात लोकसंख्येच्या तुलनेत सर्वाधिक करोना रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर करोना प्रसाराची साखळी तोडून फैलाव रोखण्यासाठी राज्यभरातील विचार करता सर्वात जास्त चाचण्या येथे घेण्यात येत आहेत. जे संशयित घाबरत होते, नाव सांगत नव्हते, अशांचा प्रशासनाच्या मदतीने शोध घेऊन त्यांचीही तपासणी करण्यात येत आहे. जे करोनाबाधित आहेत, अशा लोकांच्या संपर्कात जे आले आहेत, अशा लोकांच्या देखील चाचण्या करण्यात आल्या आहेत. तसेच रुग्ण सापडत असल्याने प्रशासनही काळजी घेत आहे.
वेगळ्या पॅटर्नची गरज नाही ः पवार
प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे करोनाचा इतर भागात फैलाव झाला नाही. चाचण्या, शोधमोहीम, सुरक्षितता हे सर्व प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. रुग्णांची संख्या वाढली असली, तरी जेवढे आपण मुळाशी जाऊ तेवढा इतरांना धोका होणार नाही. आपल्याला प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा आहे. कर्जत-जामखेडला कोणत्याही वेगळ्या पॅटर्नची गरज नाही. येथे पहिल्यापासूनच योग्य नियोजन सुरू असल्याचे यावेळी आ. रोहित पवार यांनी सांगितले.