बेलथंगडी (कर्नाटक) – कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला असून सध्या जे नेते भाजपमध्ये उरलेले आहेत ते त्या पक्षाच्या भूमिकेमुळे पोळलेलेल आहेत. भाजपचे घर आता विभाजीत झाले आहे.
त्यामुळे आता भाजपने काहीही केले तरी कर्नाटकात आता कॉंग्रेसचीच सत्ता येणार आहे असे प्रतिपादन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी केले आहे. आज येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा दावा केला.
शिवकुमार यांनी शनिवारी आरोप केला होता की भाजपची लीगल टीम विधानसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेस उमेदवारांचे अर्ज बाद ठरवण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई वैयक्तिकरित्या अधिकाऱ्यांना फोन करतात त्यामुळेच आम्ही मुख्यमंत्र्यांचे कॉल रजिस्टर तपासण्याची विनंती निवडणूक आयोगाला केली आहे. असे त्यांनी नमूद केले.
भाजप मधून कॉंग्रेस मध्ये आलेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचाही कॉंग्रेसने प्रचारात चांगला उपयोग करून घ्यायचे ठरवले आहे. ते लिंगायत समाजाचे असल्याने या समाजातील अनेक भाजप कार्यकर्ते आता कॉंग्रेसच्या वाटेवर असल्याचा दावाही कॉंग्रेसकडून केला जात आहे.