स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच वीज पुरवठ्याचे प्रयत्न
- निकृष्ट दर्जाच्या कामामुळे 30 ते 35 खांब पडले
- दुर्गम भागातील आदिवासी बांधवांकडे दुर्लक्ष
टाकवे बुद्रुक – दि. 30 (वार्ताहर) – देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशके उलटून गेली; परंतु आंदर मावळातील काही गावांच्या नशिबीचा अंधार अजून मिटला नाही. दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती या केंद्र सरकारच्या योजनेच्या माध्यमातून आंदर मावळातील कुसुर पठारावरील आदिवासी बाधवांना वीज उपलब्ध करून देण्याचे काम सुरुवातीला युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले होते. यामुळे आदिवासी बांधवांना वीज येणार असा आशेचा किरण दिसत होता; परंतु ज्या खांबांवरून ही वीज येणार आहे आणि ते खांबच आता जमिनीवर आडवे पडले असून, या परिसरातील ग्रामस्थांच्या नशिबी अंधार कायम आहे.
आंदर मावळातील कुसुर पठार काब्रे पठार या दुर्गम आदिवासी भागात आजपर्यंत वीज पोहोचलेली नसल्याने तंत्रज्ञानाच्या बाबतीत खूपच वेगाने धावत असलेल्या बाह्य जगाच्या तुलनेत हा परिसर खूपच मागे किंवा खऱ्या अर्थाने मागास राहिला आहे. दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती या योजनेअंतर्गत वीज पुरवठा करण्याचे प्रयत्न पहिल्यांदाच सुरू झाले. शिवसेना तालुका प्रमुख राजू खांडभोर यांनी खासदारांकडे मागणी करून या परिसरात दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेद्वारे वीज आणण्यासाठी पाठपुरावाही केला.
त्यानुसार केंद्र सरकारच्या या योजनेतून कामाला मंजुरीही मिळाली. सहा महिन्यांपूर्वी कामाला सुरुवातही झाली. मात्र प्रत्येक कामाप्रमाणे या कामातही दिरंगाई डोईजड झाली. काम व्यवस्थित न झाल्याने वीज वाहिन्यांना भार पेलण्यासाठी लावण्यात आलेले 30 ते 35 खांब जमिनीवर आडवे पडलेले असल्याने हा भाग अजूनही अंधारातच आहे.
ठेकेदाराचा हलगर्जीपणा
सहा महिन्यांपूर्वी सुरु झालेल्या या कामात ठेकेदाराचा हलगर्जी आणि निष्काळजीपणा स्पष्ट दिसून येत आहे. हे काम इतक्या तकलादूपणे जमिनीमध्ये लावण्यात आले होते. पावसाच्या फटक्याने एक-एक करत 30 ते 35 खांब आडवे झाले आणि सोबतच लवकरच वीज मिळण्याच्या आशाही धुळीला मिळू लागल्या. याबाबत ग्रामस्थांकडून रोष व्यक्त होत आहे.
केंद्र सरकारच्या दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती या योजनेतून कामाला मंजुरी मिळाली. पहिल्यांदाच या दुर्गम भागात वीज येणार आहे. परंतु ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे खांब कोसळले आणि सहा महिन्यांपासून हे काम बंद आहे. याचा फटका आदिवासी बांधवांना बसत आहे.
– राजू खांडभोर, तालुका शिवसेना प्रमुख