नगर -सलग दोन दिवस वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे नगर शहरासह सावेडी उपनगर परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. काही भागात तब्बल 72 तास उलटूनही वीजपुरवठा सुरुळीत झाला नाही. वीजवाहक तारांवर झाडे उन्मळून पडल्याने वीज खंडित झाली. अनेक भागात शनिवारी संध्याकाळपासून वीज पुरवठा बंद असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. महावितरणचे अधिकारी, कर्मचारी नागरिकांचे फोन घेत नसल्याने नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.
शनिवारी व रविवारी सलग दोन दिवस झालेल्या वादळी पावसामुळे सावेडी उपनगरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून फ्लेक्स, होर्डिंग फाटले, झाडे विद्युत वाहक तारांवर पडल्याने महावितरणची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच टिव्ही केबल, पथदिवे वाकण्याचे घरावरील पत्रे उडण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे काही भागात विद्युत पुरवठा अजूनही सुरुळीत झाला नाही. तर काही भागात 72 तास उलटून ही विद्युत पुरवठा सुरु झाला नाही.
भिस्तबाग, गुलमोहर रस्ता, प्रोफेसर कॉलनी, रासने नगर, एलआयसी कॉलनी, म्युनिसिपल हडको शनिवार संध्यापाळ पासून वीज पुरवठा खंडीत होता. तर सोमवारी कवडे वस्ती (नालेगाव), बंधन लॉन जवळ दोन मोठे झाड पडल्याने तवले नगर, बायजाबाई सोसायटी, गांधी मळा येथे वीज वाहक तारा तुटल्याने सिव्हिल हडको येथील रोहित्र बंद पडल्याने रात्री उशिरा पर्यंत वीज पुरवठा बंद होता. मात्र, या अवकाळी पावसाने शहरासह ग्रामीण भागात आदाजे 35 लाखांचे नुकसान झाले असल्याचे महावितण विभागाकडून सांगण्यात आले.