-->

ब्रिटिशकालीन विश्रामधामची अखेरची घटका

निमगाव केतकीत पाटबंधारे उपविभाग समस्यांच्या गर्तेत : तीन वर्षांपासून पाणीपुरवठा खंडित

नीलकंठ मोहिते

रेडा – पुणे पाटबंधारे विभागाअंतर्गत असणारे निमगाव केतकी पाटबंधारे उपविभागाच्या कामास आणि वसाहत, कार्यालयाला अनेक समस्यांनी ग्रासले आहे. ब्रिटिशकालीन विश्रामधाम व कार्यालय जीर्ण झाल्यामुळे अखेरच्या घटका मोजत आहे. विदारक चित्र निर्माण झाले आहे त्यामुळे 12 हजार हेक्‍टर क्षेत्र सिंचित करण्यासाठी चालणारी यंत्रणा रडारवर कशासाठी, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.

ब्रिटिशकालीन निमगाव केतकी पाटबंधारे उपविभागाची कार्यालय इमारत, विश्रामधाम व शाखा अभियंता यांची निवासस्थाने, वायरलेस केंद्राची कौलारू पद्धतीची जीर्ण झालेली बांधकामे आहेत. इंदापूर- बारामती रस्त्यावर निमगाव केतकी हे दुष्काळी 22 गावांतील बाजाराचे व दळणवळणाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. विभागाचा कारभार चालण्यासाठी 42 अधिकारी, कर्मचारी यांची गरज आहे. मात्र, केवळ 18 कर्मचारी उपविभागात काम करीत आहेत. चार शाखा अभियंता आवश्‍यक असताना केवळ दोन शाखा अभियंते कार्यरत असल्यामुळे अतिरिक्त कामाचा ताण वाढला आहे.

विश्रामग्रह हे ब्रिटिशकाळातील असल्यामुळे यामध्ये कक्ष क्रमांक एक व कक्ष क्रमांक दोन, असे दोन सुट आहेत. विश्रामगृहावर जुनाट पद्धतीची कौले जीर्ण झाली आहेत. पावसाळ्यात विश्रामगृहात साचत आहे. विश्रामगृहातील खुर्च्या, दिवाण, गाद्या जीर्ण झाल्या आहेत. स्वच्छतागृह बंद पडलेले आहे. वसाहतीला पाणीपुरवठा करण्यासाठी ब्रिटिशकालीन विहीर गाळाने भरली आहे. त्यामुळे पाण्याचा झरा गायब झाला आहे.

तीन वर्षापासून पाणी मिळत नाही. पाटबंधारे विभागामध्ये वायरलेस दूरसंवेदन यंत्रणा निकामी झाली आहे. त्यामुळे वरिष्ठ कार्यालयाचे आदेश विभागाला वेळेत मिळत नाहीत. झालेले निर्णय कळत नाहीत. ही यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी मागणी केली आहे. वसाहतीला संरक्षण भिंत लाखो रुपये खर्चून अद्ययावत बांधली. परंतु मुख्य गेट बसवले नाहीत. त्यामुळे खासगी वाहनांची वर्दळ या हद्दीतून होत आहे. त्यामुळे विश्रामगृह व कार्यालय धुळीने माखले आहे.

शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पाठपुरावा करून निमगाव केतकी येथील पाटबंधारे कार्यालयाला उपविभागाची निर्मिती 2017 मध्ये केली. राज्य शासनाकडे या उपविभागात कर्मचारी, अधिकाऱ्यांचे संख्याबळ वाढविण्यासाठी माझा सातत्याने पाठपुरावा सुरू राहणार आहे. विश्रामधाम, अद्ययावत कार्यालय सुस्थितीत करण्यासाठी शासनाकडून निधी मिळवला जाईल. – दत्तात्रय भरणे, आमदार.

शाखा अभियंता म्हणून काम करीत असताना अपुरे कर्मचाऱ्यांचे संख्याबळ तसेच कार्यालयाची झालेली पडझड व विश्रामधाम बंद पडलेले आहे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी मोठ्या आहेत. विश्रामधाम व अद्ययावत कार्यालय निर्माण झाले पाहिजे. संवर्धन संगोपनासाठी निधी उपलब्ध झाला पाहिजे.
– आर. डी. झगडे, शाखा अभियंता.

सद्यस्थिती वरिष्ठ कार्यालयात कळवली – 
उपविभागीय अभियंता विजय यादव म्हणाले की, मी मागील दोन महिन्यांपासूनच या ठिकाणी रुजू झालो आहे. निमगाव केतकी पाटबंधारे उपविभागीय कार्यालयाचे बांधकाम तसेच विश्रामगृह पूर्ण नादुरुस्त झाले आहे. पाण्याची व्यवस्था नाही. यासंबंधी सर्व प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला पाठवला आहे. नूतनीकरण करण्याची मागणी केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.