पिंपरी – भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन, महाप्रसाद आदी कार्यक्रमांनी मावळ तालुक्यात ठिकठिकाणी रामजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भाविकांनी श्रीराम मंदीरांमध्ये मोठी गर्दी केली होती. यावेळी महिलांनी श्रीराम जन्माचा पाळणा म्हटला. त्यानंतर भाविकांना सुंठवडा वाटप करण्यात आला.
दुपारी बारा वाजताच इंदोरी येथील श्री राममंदिर परिसर अयोध्यापती मर्यादा पुरुषोत्तम सियावर रामचंद्र की जय…प्रभू श्रीराम की जय’च्या गजराने दणाणून गेला. फुलांची उधळण करत हजारो भाविकांनी रविवारी (दि.10) श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा केला.
इंदोरी,इंद्रायणीनगर येथील श्री राम मंदिरात रविवारी पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यानिमित्ताने भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन, महाप्रसाद आदी कार्यक्रम घेण्यात आले. श्रीरामाच्या मूर्तीला अलंकार तसेच नवीन वस्त्रे परिधान करण्यात आली होती. तसेच मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सकाळी दहा वाजता किर्तनकार ह.भ.प.अर्जुन महाराज फलके यांचे “श्रीराम जन्मोत्सव’ या विषयावर कीर्तन झाले. गायनचार्य शिवाजी महाराज भोसले यांनी त्यांना साथ दिली.
आरतीनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यामध्ये श्री राम भजनी मंडळ तसेच इंद्रायणी मित्र मंडळ यांचे विशेष सहकार्य लाभले.
वडगाव मावळ – येथील श्री पोटोबा देवस्थान संस्थान चे वतीने श्री पोटोबा महाराज मंदिरात रामनवमी निमित्ताने काकडा आरती भजनी मंडळाने, भजनातून जन्माचा अभंग व श्रीराम जन्माचा पाळणा म्हणून राम जन्मोत्सव साजरा केला.
यावेळी देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, सचिव अनंता कुडे, विश्वस्त किरण भिलारे, चंद्रकांत ढोरे, ऍड. अशोकराव ढमाले, ऍड.तुकाराम काटे, अरुण चव्हाण, तुकाराम ढोरे, सुभाषराव जाधव, सुनिता कुडे आदीसह, विणेकरी बबनराव भिलारे, शंकरराव म्हाळसकर, राघूजी कुडे, विठ्ठलराव ढोरे, मधुकर पानसरे, शिवाजी होणावळे, बाळासाहेब नवघणे, पुजारी मधुकर गुरव आदिंसह महिला भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.