मतदान प्रक्रिया शांततेत एकही तक्रार अथवा गुन्हा दाखल नाही

पुणे – पुणे पोलीस आयुक्‍तालयाच्या अखत्यारितील 9 विधानसभा मतदारसंघांत मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडली. मतदानाची वेळ संपेपर्यंत पोलीस ठाण्यात निवडणुकीसंदर्भात एकही तक्रार अथवा गुन्हा दाखल झाला नव्हता. काही भागांत नोटीस बजावूनही सक्रिय असलेल्या काही सराईतांना मात्र ताब्यात घेत कारवाई केल्याची माहिती सहपोलीस आयुक्‍त रवींद्र शिसवे यांनी दिली.

मतदान शांततेत होण्यासाठी साडेआठ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला होता. त्यांच्या मदतीला बाहेरील 1 हजार पोलीस आणि अधिकाऱ्यांचे अतिरिक्‍त मनुष्यबळही उपलब्ध करून देण्यात आले होते. मतदानाच्या पूर्व संध्येला आयुक्‍त कार्यालय, परिमंडळाचे उपायुक्‍तांनी पहाटे अडीच वाजेपर्यंत शहरात गस्त घातली. यासोबतच शहरात निवडणूक आणि मतदानाच्या पार्श्‍वभूमीवर विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांनी रूट मार्चचे आयोजन केले होते. त्यामुळे समाजकंटक आणि गुन्हेगारांच्या मनात भीती निर्माण करण्यास पोलिसांना यश आले. त्याचीच परिणिती म्हणून मतदानाच्या दिवशी कोठेही अनुचित घटना घडली नाही.

मतदान केंद्रावर सायंकाळी 6 वाजेपर्यंत जे मतदार पोहोचले त्यांना टोकन देऊन आत घेण्यात आले, तसेच ईव्हीएम मशीनच्या पेट्या संकलन केंद्रावर आणि ते कोरेगाव पार्क येथील एफसीआय गोडावून येथे पाठवून देण्यात येणार आहेत. यासाठी “एसआरपीएफ’ आणि “सीपीएमएफ’ची बंदोबस्तासाठी सहकार्य घेण्यात येणार आहेत. यासह स्ट्रॉंग रूमला त्रिस्तरीय सुरक्षा देण्यात आली आहे. मतमोजणीच्या दिवशी सुमारे आठशे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

मतमोजणीला मिरवणुकीस परवानगी नाही
मतमोजणीच्या दिवशी उमेदवारांना विजयी मिरवणूक काढता येणार नाही. त्यानंतर पुढील दिवसात विजयी मिरवणूक काढण्यासाठी पोलिसांची परवानगी घेणे गरजेचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)