वळसे पाटील, बाणखेले यांचा विजयाचा दावा

आंबेगावात प्रमुख उमेदवारांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्‍क

मंचर – आंबेगाव विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनी निरगुडसर गावी तर शिवसेनेचे उमेदवार राजाराम बाणखेले यांनी आपल्या कुटुंबासह मंचर येथील मतदान केंद्रावर सोमवारी (दि. 21) मतदानाचा हक्क बजावला. आपणच विजयी होऊ असा दावा त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

निरगुडसर येथे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनी पत्नी किरणताई वळसे पाटील, मुलगी पूर्वाताई वळसे पाटील यांच्यासह पावणे अकरा वाजता मतदानाचा हक्क बजावला. प्रसार माध्यमांशी बोलताना उमेदवार दिलीप वळसे पाटील म्हणाले, मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. मतदारांनी मतदान करताना योग्य विचार करुन आपल्या पसंतीचे सरकार निवडले पाहिजे. राज्याला पुढे घेऊन जाईल, असे कर्तबगार सरकार निवडणे गरजेचे आहे.

राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्ष आघाडीला चांगले वातावरण आहे. मतदानापासून कोणी वंचित राहिले नाही पाहिजे. मतदारांनी कोणत्याही अमिषाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजवावा, असे आवाहन वळसे पाटील यांनी केले.

शिवसेनेचे उमेदवार राजाराम बाणखेले यांनी पत्नी आशादेवी, मुलगा रंजन यांच्याबरोबर मंचर येथील मतदान केंद्रावर सकाळी सात वाजता मतदानाचा हक्क बजावला. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पत्नी कल्पनाताई, मुलगा अक्षय, सुन माधुरी यांनी लांडेवाडी येथील मतदान केंद्रावर सकाळी साडे आठ वाजता मतदानाचा हक्क बजावला.

जिल्हा परिषद सदस्या तुलसी सचिन भोर यांनी चास येथील जिल्हा परिषद शाळेत मतदान केंद्रावर सकाळी साडे दहा वाजता मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी निरगुडसर येथील तर मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांनी नागापूर येथे मतदानाचा हक्क बजावला.

शरद सहकारी बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष संजय थोरात यांनी मंचर येथील तसेच आंबेगाव तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष विष्णुकाका हिंगे यांनी अवसरी बुद्रुक येथील मतदान केंद्रावर तर शिवसेनेचे तालुकाध्यक्ष अरुण गिरे यांनी मेंगडेवाडी येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. निरगुडसर ःयेथील मतदान केंद्रावर आंबेगाव विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनी कुटुंबासह मतदान केले.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.