उपनगराच्या विविध भागांत बालकामगाराची संख्या वाढतेय
– उत्कर्ष खवले
वानवडी – शहराच्या उपनगरांतील विविध भागांमध्ये अनेक ठिकाणी बालकामगार काम करीत असताना दिसत आहेत. आमच्याकडे बालकामगार नसल्याचे फलक हॉटेल, दुकानासह विविध ठिकाणी दिसत असले तरी अनेक ठिकाणी आता बालकामगारांकडून काम करून घेतले जात आहे. विशेषत: यामध्ये परप्रांतीयांच्या मुलांचा अधिक भरणा केल्याचे निदर्शनास येत आहे. विशेष म्हणजे प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे.
पुणे शहरालगतच्या उपनगरांत मोठ्या प्रमाणात बालकामगार कामासाठी ठेवले जात आहेत. आमच्याकडे बालकामगार नाहीत, असे फलक लावण्यात येत असले तरी वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. बाहेर चकाचक दिसणाऱ्या हॉटेल, दुकानांतील आतील वास्तव धगधगते असून अशा ठिकाणी बालकामगार काम करीत असल्याचे समोर येत आहे.
शहरात तसेच उपनगरांत परप्रांतीयांचे लोंढे आले आहेत. यामध्ये बहुतांशी प्रमाणात अशिक्षित लोकांचे प्रमाण अधिक आहे, अशा कुटुंबामध्ये लहान मुलांची संख्याही अधिक असते. आर्थिक परिस्थितीतून अशा मुलांना शाळेत पाठविण्यापेक्षा कामावर पाठविण्यावर या लोकांचा अधिक भर असतो. राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था असेल तर अशी मुले अगदी कमी पैशातही काम करण्यास तयार होतात. यातूनच अशा मुलांना कामावर ठेवण्याचे प्रमाण वाढत आहे.
बालकामगार कायद्यानुसार कोणत्याही ठिकाणी 14 वर्षांखालील मुलांना काम करण्यास बंदी आहे. त्याचबरोबर सुधारित कायद्यानुसार 14 ते 18 वर्षांखालील मुलांना घातक उद्योगसमूहांमध्ये काम करण्याची परवानगी देता येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. बालमजुरी हा दखलपात्र गुन्हा ठरवून त्यासाठी आता संबंधित मालकांना 50 हजार रुपये दंड ठोठाविण्यात येणार आहे. परंतु, या कायद्यातूनही पळवाटा शोधून बालकामगारांना राबवून घेतले जात आहे. कामावर घेतानाच बालकामगारांकडून खोटी जन्मतारीख तसेच अन्य माहिती अर्जावर भरून घेतली जात आहे. तसेच, उपनगरांत मोठ्या प्रमाणात खोटे आधार कार्ड तयार करून त्यामध्ये या बालकामगाराचे वय 18 दर्शविले जात आहे. त्यामुळे कायदा मोडीत निघत आहे.
…कागदपत्रेच नाहीत
बालकामगारांकडे शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला, अशा प्रकारचे कोणतेही दाखले नसल्याने त्यांची खोटी कागदपत्रे तयार करून दुकान मालक कमी पगारात त्यांच्याकडून काम करून घेत आहेत. प्रशासन यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करीत नसल्याने हा प्रकार उपनगरात सर्रासपणे सुरू आहे.