प्रभातचे वृत्त सर्वात आधी आणि खरे
पुणे – केंद्रशासन आणि राज्यशासनाने सौम्य लक्षणे असलेल्या तसेच लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरीच विलगीकरण तसेच उपचार घेण्यास मुभा दिली असली तरी पुण्यात मात्र, सरसकट सर्व करोनाबाधितांवर रुग्णालयांतच उपचार होणार असल्याचे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्पष्ट केले.
राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत पुण्यात करोनाबाधितांवर उपचारासाठी महापालिकेकडे सुमारे 12 हजार बेड उपलब्ध आहेत. शहरातील एकूण रुग्णांपैकी सुमारे 80 टक्के रुग्ण हे दाट लोकवस्तीच्या भागातील आहेत, त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयातच उपचार केले जाणार आहेत.
करोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या मात्र बाधित रुग्णांची संख्या जवळपास 70 ते 80 टक्के आहे. तसेच, त्यांच्याकडून इतरांना प्रसार होण्याची शक्यताही नगण्य आहे. परिणामी, अशा रुग्णांना घरातच पुरेशी जागा तसेच त्याच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असल्यास हमीपत्र घेऊन घरीच विलगीकरणास केंद्र व राज्य शासनाने मागर्दशक सूचना जाहीर केल्या आहेत. या निर्णयानंतर शहरात मोठ्या प्रमाणात खासगी रुग्णालये तसेच रुग्णांकडून घरीच विलगीकरणाबाबत पालिकेकडे विचारणा केली जात आहे.
मात्र, प्रशासनाने त्याबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याचे आयुक्तांनी गुरुवारी स्पष्ट केले. शहरात सध्या 12 हजार बेडची उपचाराची सुविधा आहे. तर प्रत्यक्षात सक्रीय रुग्ण अडीच हजारच आहेत. त्यामुळे जवळपास नऊ हजारच्यावर बेड शिल्लक आहेत. त्यामुळे कोणताही धोका पत्करून त्यांना घरी सोडणे योग्य नसल्याचेही आयुक्त गायकवाड यांनी स्पष्ट केले.
माजी आयएसएस अधिकाऱ्यालाही नकार…
करोनाची बाधा झालेल्या एका माजी आयएसएस अधिकाऱ्याने पालिकेकडे घरीच उपचार घेण्यासाठी मुभा देण्याची मागणी केली होती. मात्र, पालिकेने या निर्णयाची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांनाही पालिकेने निश्चित केलेल्या कोविड रुग्णालयातच उपचार घ्यावे लागतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले. नियम सर्वांना सारखे असून तो मोडला जाणार नसल्याचे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.