सिलीगुडी – पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथील डागापूरमधील कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. परंतु कार्यक्रमादरम्यानच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. यानंतर तातडीने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. शरीरातील साखरेची पातळी कमी झाल्यामुळे नितीन गडकरी यांची प्रकृती खालावली असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. सध्या नितीन गडकरी यांची प्रकृती ठीक असल्याचं डॉक्टरांनी सांगितले.
पश्चिम बंगालच्या सिलीगुडीमध्ये सरकारी योजनांच्या उद्घाटन कार्यक्रमास नितीन गडकरी उपस्थित होते. त्यांनी सिलीगुडीमध्ये 1206 कोटी रुपये खर्चाच्या 3 एनएच प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. हा कार्यक्रम सुरु असतानाच त्यांची प्रकृती अचानक बिघडली. यानंतर सुकना येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक पोहोचले आणि त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले.
दरम्यान, कार्यक्रमादरम्यान नितीन गडकरी यांची प्रकृती खालावण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी डिसेंबर 2018 मध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील एका कार्यक्रमादरम्यान त्यांची प्रकृती खालावली होती. गडकरी मंचावरच बेशुद्ध पडले होते.