नागपूर – भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पक्षाकडून महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानंतर त्यांचा आज (दि. 13) नागपूरात सत्कार समारंभ पार पडला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांची स्तुती केली.
गडकरी म्हणाले, एखाद्याकडून आपले काम कसे करवून घ्यायचे यामध्ये बावनकुळे एक्स्पर्ट आहेत. कोणाचं पत्र, कोणाची फाईल आणि निधी कोणत्या गावात गेला हे फक्त त्यांनाच कळते. मात्र त्यांचं काम तोपर्यंत निघून जाते. बावनकुळे हे माणसाची बाई आणि बाईचा माणूस करु शकतात, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कौशल्याची स्तुती केली.
एखाचे काम करायचे असल्यास ते कशाप्रकारे पूर्णत्वास आणायचे याचे कौशल्यही बावनकुळे यांच्यात आहे. त्याचबरोबर नागपूर जिल्ह्यात पक्षाला भक्कम करण्यात बावनकुळे यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी स्वतःच्या आरोग्याची आणि कुटुंबाची चिंता सोडून स्वतःला पक्षासाठी झोकून दिले. त्यांनी उर्जा विभागाचे मंत्री असताना राज्याच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. यासोबतच त्यांनी सर्व अडचणी सोडविल्या, असेही गडकरी यांनी सांगितले.
दरम्यान, या सत्कार सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांसह राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे, भाजपचे ज्येष्ठ नेते अजय संचेती यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. सत्कार सोहळ्यात उपस्थित नेत्यांनी बावनकुळे यांना शुभेच्छा देत त्यांच्यातील कौशल्याची स्तुती केली.