जीनिव्हा – आगामी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या नियोजित वेळापत्रकात थोडा बदल करण्यात आला आहे. यजमान कतारला सलामीचा सामना खेळता यावा आणि त्यापूर्वी उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करता यावे, या हेतूने ही स्पर्धा नियोजित तारखेपेक्षा एक दिवस आधी, म्हणजेच 21 ऐवजी 20 नोव्हेंबरला होणार आहे, अशी अधिकृत घोषणा “फिफा’ने केली.
कतार आणि इक्वाडोर या संघांमध्ये 20 नोव्हेंबरला दोहा येथील 60 हजार प्रेक्षकसंख्या असलेल्या अल बयात स्टेडियममध्ये विश्वचषकाच्या सलामीचा सामना रंगणार आहे.
विश्वचषकाला एक दिवस आधी प्रारंभ करण्याच्या “फिफा’च्या निर्णयाला आयोजक, दक्षिण अमेरिकन फुटबॉल महासंघ, तसेच कतार आणि इक्वाडोरच्या राष्ट्रीय फुटबॉल संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे.