Nitin Gadkari- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या विकासाच्या दाव्याचे वाभाडे काढले आहेत. देशभरातील शेतकरी, मजूर, गरीब आज दुःखी आहे. कारण जल, जमीन, जंगल आणि जनावर, ग्रामीण, शेती, आदिवासी भाग या ठिकाणी चांगले रस्ते नाहीत. पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही. चांगली रुग्णालये नाहीत. चांगल्या शाळा नाहीत. शेतकऱ्यांच्या उत्पादनांना चांगले दर मिळत नाहीत, असे म्हणत गडकरींनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला आहे.
गडकरी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिल्लीच्या वेशीवर सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनावर आपली रोखठोक भूमिका व्यक्त केली. काँग्रेसने त्यांचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. नितीन गडकरी शेतकरी आंदोलनावर भाष्य करताना म्हणाले की, तांदूळ मका, साखर, गव्हाचे अतिरिक्त उत्पादन हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
हरियाणात तर गहू व तांदूळ ठेवण्यासाठी रेल्वेचे प्लॅटफॉर्म वापरावे लागत आहेत. आपल्याकडे साठवणुकीची पुरेशी व्यवस्था नाही. शेती उत्पादनांचा भाव मागणी व पुरवठ्यानुसार ठरतो. पण आपल्याकडे धान्याच्या किमतींमध्ये फारसे बदल होत नाहीत. त्यामुळे शेती आर्थिकदृष्ट्या परवडेनाशी झाली. या देशाचा शेतकरी फक्त अन्नदाता नसून ऊर्जा उत्पादकही व्हावा असे माझे मत आहे, असेही गडकरी म्हणाले.
३० टक्क्यांचा फरक कसा पडला ?
जीडीपीमध्ये कृषी क्षेत्रातील विकासाचा १२ टक्के वाटा आहे. तर उत्पादन क्षेत्राचा २२ ते २४ टक्के, सेवा क्षेत्राचा ५२ ते ५४ टक्के वाटा आहे. कृषी क्षेत्रावर ६५ टक्के लोकसंख्या अवलंबून आहे. गांधीजी होते तेव्हा ९० टक्के लोकसंख्या गावात राहत होती. हा ३० टक्क्यांचा फरक कसा पडला? कारण आज गावोगावचा मजूर्, शेतकरी दु:खी आहे, असा पुनरूच्चारही त्यांनी यावेळी केला.
शेतकरी सुखी व समृद्ध कसा होईल ?
ग्रामीण भागातील शेती क्षेत्रात विकास झाला आहे. पण हा विकास इतर क्षेत्रांतील विकासाच्या तुलनेत तोकडा आहे. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही खूप काम केले. या परिस्थितीवर उपाय म्हणून आयात होणाऱ्या १६ लाख कोटींच्या इंधनापैकी ५ लाख कोटींचे इथेनॉल, ग्रीन हायड्रोजन शेतकऱ्यांनी उत्पादित केले, तर आपल्या देशातील शेतकरी सुखी व समृद्ध होईल. गावागावांत रोजगार निर्माण होईल, असे गडकरी यांनी यावेळी बोलताना सांगितले.