नवी दिल्ली – देशाचे माजी सॉलिसिटर जनरल आणि ज्येष्ठ वकील हरीश साळवे वयाच्या 68व्या वर्षी तिसऱ्यांदा बोहोल्यावर चढले आहेत. यापूर्वी 2020मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली होती. दरम्यान, ज्येष्ठ वकील हरीश साळवे हे केंद्र सरकारच्या नव्याने स्थापन झालेल्या “वन नेशन, वन निवडणूक’ समितीचे सदस्यही आहेत.
हरीश साळवे यांनी नुकतेच त्रिना यांच्यासोबत थाटामाटात लग्न केले आहे. त्रिना मुळची ब्रिटनची आहे. हरीश साळवे यांच्या लग्नाला नीता अंबानी, ललित मोदी आणि उज्ज्वला राऊत यांच्यासह जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणारे 68 वर्षीय वकील साळवे यांनी हायप्रोफाईल केस कुलभूषण जाधव यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय खटले हाताळले आहेत. कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने हेरगिरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली होती. जाधव यांच्या बाजूने खटला लढण्यासाठी साळवे यांनी कायदेशीर शुल्कात केवळ 1 रुपयांचे मानधन घेतले होते. त्यांच्या या निर्णयाचे देशभरातून कौतुक करण्यात आले होते.
दरम्यान, यापूर्वी हरीश साळवे यांनी मीनाक्षी (पहिली पत्नी) आणि कॅरोलिन ब्रॉसार्ड (2020) यांच्याशी विवाह केला होता. साळवे आणि त्यांची पूर्वाश्रमीची पत्नी मीनाक्षी यांनी 38 वर्षांच्या सुखी संसारानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला. जून 2020 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला असून दोघांना साक्षी आणि सानिया या दोन मुली आहेत.