जालना – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यात आणि शहरात देखील तीन दिवसांपासून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत असून काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना देखील समोर आल्या आहेत. त्यामुळे पोलिसांकडून आतापर्यंत 3,181 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, 33 आंदोलकांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अंतरवाली सराटी येथे शुक्रवारी आंदोलन करणाऱ्या गावकरी आणि पोलिसांत राडा झाला. दुसऱ्या दिवशी जालना शहरातील अंबड चौफुली परिसरात जाळपोळ आणि दगडफेक झाली. दरम्यान यावेळी पोलिसांनी 12 बोअर रायफलमधून हवेत गोळीबार केला. तसेच, यावेळी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज देखील करण्यात आला. दरम्यान, मागील तीन चार दिवसांत झालेल्या या सर्व घटनांनंतर पोलिसांकडून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ज्यात, गोंदी पोलीस ठाण्यात 418, तालुका ठाण्यात 2 हजार 375 , बदनापूर 260 आणि कदीम ठाण्यात 64 असे एकूण 3 हजार 181 जणांवर आतापर्यंत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.