पोलिसांनी केले दोघांना अटक
नीरा – गेल्या दोन महिन्यांत नीरा शहरामध्ये बंद सदनिका फोडून चोऱ्या करणाऱ्या दोघांना जेजुरी पोलिसांनी अटक केली आहे. तसेच पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला आहे. सासवड न्यायालयात हजर केले असता आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडीत पाठविले आहे.
अटक केलेल्या आरोपीचे नाव सुभाष मारुती जाधव (वय 3,2 रा. कांगाव, ता. देवराई, जि. बीड) व रवी भास्कर पवार (वय 25, रा. ता. पाथरी, जि. परभणी) आहे. नीरा परिसरात गेल्या दोन महिन्यांत चोरट्यांनी धुमाकूळ माजवला होता. बंद घरे व दुकाने रात्रीच्या वेळी फोडली जात होती. चोर मात्र सापडत नव्हते. त्यामुळे पोलिसांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत होते. यानंतर पोलिसांनी रात्रीची गस्त घालण्यास सुरवात केली होती. मात्र, तरीही चोर सापडत नव्हते. जेजुरी पोलीस स्टेशनचे सहय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी चोरांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक विजय वाघमारे यांच्या टीमकडे सोपवली होती.
वाघमारे व त्यांच्या टीमने गुप्तपणे कसून चौकशी केली असता त्यांना नीरा व परिसरात फुगे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर व त्यांच्या हालचालीवर संशय आला. त्यामुळे चौकशी केली असता नीरा येथे दोन ठिकाणी घरफोडी केल्याचे त्यांनी कबूल केले. त्याचबरोबर पोलिसांनी लॅपटॉप व होम थेअटरचे साऊंड जप्त केला आहे. या कारवाईत पोलीस कर्मचारी गोविंद भोसले, विनोद हाके, महेश उगले, बाळासाहेब बनकर, सुरेश गायकवाड आदी सहभागी झाले होते.