कोरेगाव भीमा ( koregaon bhima news )- शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वसेवाडी मधील गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक गुणगौरव सोहळा शनिवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सन २०२२-२३ मध्ये शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत पुणे जिल्ह्यातून शिरूर तालुक्यातील ४२ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत येऊन शिरूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा लावला.
शिरूर तालुक्याच्या या यशाचे पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक देखील केले होते. या ४२ विद्यार्थ्यांन पैकी तब्बल २२ विद्यार्थी हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वसेवाडी सणसवाडी मधील असल्याने सणसवाडी ग्रामस्थ व शाळेच्या वतीने या विद्यार्थ्यांचा व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा जंगी सत्कार सोहळा ठेवला. या सत्कार सोहळ्यास आमदार अशोक पवार यांनी उपस्थित राहून विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीने अशोक पवार यांचे ढोल लेझीम च्या गजरात स्वागत करून मॅटवरील कुस्तीचे प्रात्यक्षिक दाखवले. यावेळी आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शन चा देखील उद्घाटन सोहळा पार पडला.
यावेळी आमदार अशोक पवार, माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य संचालक संपत सूर्यवंशी, शिक्षण अधिकारी वाखारे, गट शिक्षण अधिकारी अनिल बाबर, राजेंद्र साठे, सरपंच सुवर्णा रामदास दरेकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमोल हरगुडे, उपाध्यक्ष अमोल दरेकर शाळेचे मुख्याध्यापक संतोष गोसावी यांसह असंख्य मान्यवर उपस्थित होते.
नववी ते बारावी पर्यंत वर्ग सुरू करण्याची मागणी
सणसवाडी शाळेत इयत्ता आठवीपर्यंत वर्ग सुरू आहेत. शाळेच्या शिक्षणाचा दर्जा ही कौतुकास्पद आहे. त्यामुळे नववी ते बारावी पर्यंत चे वर्ग सुरू करण्याची सणसवाडी ग्रामस्थ व मुख्याध्यापक संतोष गोसावी यांच्या अनेक दिवसांपासूनच्या मागणीला शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी दुजोरा देत लवकर च वर्ग सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
सणसवाडी शाळेत परप्रांतीय विद्यार्थ्यांचा मराठीत बोलबाला | koregaon bhima news
सणसवाडी मध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगिक कंपन्या आहेत. या कंपन्यांत काम करण्यासाठी आलेल्या असंख्य परप्रांतीय मजुरांनी आपल्या मुलांना मराठी शाळेत घालण्यास पसंती दिली आहे. या मुलांनी देखील मराठी माध्यमातील शाळेत शिकून मराठीवर आपले प्रभुत्व निर्माण केले आहे. मराठी शिक्षणासह येथील विविध ज्ञान अंगिकरणारे परप्रांतीय अनेक विद्यार्थी असणारी जिल्हा परिषद शाळा परिसरात नावलौकिक मिळवत आहे.