शिंदे वासुली – वासुली (ता. खेड) औद्योगिक वसाहत परिसरात तुटलेल्या विद्युत तारांचा शुक्रवारी (दि. 2) दुपारी साडेबाराच्या सुमारास तीन म्हशींचा विजेचा धक्का (शॉक) लागल्याने मृत्यू झाला. दरम्यान, या परिसरात गेल्या 10 ते 15 दिवसांपासून दमदार पाऊस कोसळत आहे. त्यातच या वीज वाहक तारा कोसळल्याने गुरुवारी दुपारी गुल झालेली बत्ती शुक्रवारी (दि. 3) दुपारी बाराच्या सुमारास आली.
वासुली येथील दुग्धव्यवसायिक शेतकरी कोंडीबा सावळेराम शेळके यांच्या तीन म्हशींचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याने त्यांचे सुमारे तीन लाख 25 हजारांचे नुकसान झाले आहे. वासुलीच्या ठाकरवस्तीवरील एका बंद विद्युत खांबावरील आर्थिंगची वायर तुटून जमीनीवर पडलेली होती. याठिकाणी चरत असलेल्या म्हसींच्या पायाला अडकली आणि ओढाताणीमध्ये शेजारील जिवंत (चालू) असलेल्या थ्री फेज लाईनच्या तारांच्या संपर्काने विद्यूत पुरवठा होऊन तीनही म्हशींना जबरदस्त धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मंडलाधिकारी बाबा साळूंके, एमआयडीसीचे कर्मचारी जगताप, तलाठी दत्तात्रय केंगले, ग्रामसेवक नाईकडे, अमोल पाचपुते, सचिन पाचपुते यांनी पंचनामा केला.