तिरुअनंतपुरम – केरळमध्ये आरोग्य कर्मचाऱ्याला निपाह संसर्ग ( Nipah virus) झाल्याचे निष्पन्न झाल्याने निपाह विषाणूबाधित रुग्णांची संख्या पाच झाली. असून दोघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, निपाहचा संसर्ग वाढत असल्याने केरळच्या कोझिकोड जिल्ह्यांत शैक्षणिक संस्था आज बंद ठेवण्यात आल्या होत्या.
कोझिकोडमधील सर्व शैक्षणिक संस्था उद्या, शुक्रवारीही बंद राहणार आहेत. या काळात ऑनलाइन वर्ग घेण्याची मुभा आहे, अशी पोस्ट कोझिकोडच्या ए गीता यांनी फेसबूकवर केली आहे. मात्र, विद्यापीठाच्या परीक्षांच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही, असेही त्या म्हणाल्या.
केरळमध्ये चार निपाहबाधित रुग्ण होते. बुधवारी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा निपाह अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णांची संख्या आता पाच झाली आहे. निपाहबाधित रुग्णावर उपचार करताना हा आरोग्य कर्मचारीही निपाहच्या विळख्यात अडकला.
निपाहबाधितांच्या संपर्कात 153 आरोग्य कर्मचारी आहेत. तर बाधित झालेल्या पाचपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. म्हणजे तिघांवर उपचार सुरू आहेत.