सातारा – पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालयात वार्षिक क्रीडा दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. विद्यालयातील शिवालिक सदनाने चॅम्पियनशिप मिळवली. दुसऱ्या स्थानावर उदयगिरी सदन तर तिसरे स्थान अरावली सदनास प्राप्त झाले.
पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालयात वार्षिक क्रीडा दिवसाची सुरुवात दि. 11 रोजी उत्साहात करण्यात आली.
दुसऱ्या दिवशी क्रीडा दिवसाची सांगता झाली. विद्यार्थ्यांनी विविध खेळांमध्ये सहभागी होऊन खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत विशेष कौशल्याने गुण प्रदर्शन केले. वेगवेगळ्या खेळांत खेळाडूंनी यश संपादन केले. दि. १२ जानेवारी युवा दिनाचे औचित्य साधून राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंदांच्या जयंतीप्रसंगी समारोह व पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम झाला. सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. गवळी म्हणाले, जीवनात शिक्षणाएवढेच खेळाचे महत्व आहे. खेळ व शिक्षण दोन्हींचा समन्वय साधत आपण सर्वोच्च पदापर्यंत प्रगती साधू शकतो. अशा प्रकारची परंपरा आपल्या विद्यालयाने ठेवलेली आहे.
विद्यालयातील विद्यार्थिनींनी बँड पथकाचे संचालन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. स्वरक्षणासाठी मुलींना ज्युडोचे प्रशिक्षण देण्यात आले असून त्याचे प्रात्यक्षिक मुलींनी सादर केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुलांनी परेडचा उत्कृष्ट नमुना सर्वांपुढे ठेवला. प्राचार्या श्रीमती अँन्सी जॉर्ज यांनी मार्गदर्शन केले. सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना खेळाविषयी प्रोत्साहन दिले. समारोप व पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाचे संचालन जॉर्ज जोसेफ, विद्यार्थिनी प्रेरणा इंगळे व रसिका पाटील यांनी केले. पोलीस कर्मचारी अर्चना कदम व विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमास तसेच वार्षिक क्रीडा उत्सव यशस्वी करण्यासाठी विद्यालयाच्या क्रीडा शिक्षिका डॉ. पूजा अकोटकर व क्रीडा शिक्षक जयदीप पाटील यांनी परिश्रम घेतले. वरिष्ठ शिक्षक अरविंद प्रताप सिंह यांनी आभार लाभले.