पुणे – लायन्स क्लब ऑफ रहाटणी आणि लिओ क्लब ऑफ रहाटणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लायन्स क्लब ऑफ रहाटणी करंडक 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत विजेतेपदासाठीच्या लढतीत परंडवाल क्रिकेट अकादमी संघाने एम.जी स्पोर्टस् क्लब संघाचा 9 गडी राखून दणदणीत पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेत अंतिम लढतीत परंडवाल क्रिकेट अकादमी संघाने एम.जी स्पोर्टस् क्लब संघाचा 9 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना एम.जी स्पोर्टस् क्लब संघ 24.2 षटकात 84 धावात गारद झाला. हे लक्ष परंडवाल क्रिकेट अकादमीने 15.3 षटकात 1 गडी गमावत सहज पुर्ण करत विजेतेपद पटकावले. 19 धावात 3 गडी बाद करणारा निलय गुरव सामनावीर ठरला.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघांना करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रांतपाल एमजेएफ लायन हेमंत नाईक, डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन (स्पोर्टस) लायन संतोष गायकवाड, झोन चेअरपर्सन एमजेएफ लायन धनराज मंघनानी, लायन्स क्लब ऑफ पुणे रहाटणीचे अध्यक्ष लायन प्रमोद भोंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष लायन धिरज कदम, लिओ क्लबचे अध्यक्ष लायन श्रेयस चव्हाण, क्लबचे संस्थापक एमजेएफ लायन वसंत कोकणे, सचिव लायन अमोल दापूरकर, खजिनदार लायन प्रशांत तेलंगे, कॅबिनेट ऑफिसर लायन समीरज अगरवाल, लायन अभिषेक मोहिते, फय्याज लांडगे आदी उपस्थित होते.
संक्षिप्त धावफलक – एम.जी स्पोर्टस् क्लब – 24.2 षटकात सर्वबाद 84 धावा. (अरोन गायकवाड 25, आरोश बन्सल 18, निलय गुरव 3-19, आर्यन यादव 2-9, यश सुर्यवंशी 2-7, वेदांत जाधव 1-10) पराभूत वि. परंडवाल क्रिकेट अकादमी – 15.3 षटकात 1 बाद 85 धावा. (प्रथमेश वाघमारे नाबाद 36, आयुष म्हाळसकर नाबाद 27, हर्षिल सावंत 1-28). सामनावीर – निलय गुरव.