निलेश राणेंचा अजित पवारांना इशारा…”भाषा नीट करा नाही तर…;

मुंबई: एकीकडे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी गोची झाली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न भाजपाकडून करण्यात येत आहे. याचपार्श्वभूमीवर भाजपाचे खासदार नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी देखील जितके गुन्हेगार एका जेलमध्ये नसतील तितके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे, अशी जहरी टीका केली होती.

निलेश राणे यांच्या या टीकेनंतर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देखील प्रत्युत्तर दिले होते. निलेश राणे वाट्टेल ते बोलतात आणि त्यावर मी व्यक्त व्हायचे का, असं अजित पवारांनी सांगितले. तसेच त्या निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, असे विधानही केले होते. अजित पवारांच्या या विधानानंतर आता पुन्हा निलेश राणे यांनी ट्विट करत उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

निलेश राणे म्हणाले की, फार कमी नेते आहेत की ज्यांना महाराष्ट्रमध्ये अनेक वर्ष मंत्रीपदे मिळाली. मात्र तरीपण महाराष्ट्राच्या विकासामध्ये काही परिणाम झाला नाही. त्यामध्ये अजित पवारांचे नाव घ्यावं लागेल, असं निलेश राणे यांनी सांगितले. अजित पवारसाहेब भाषा नीट करा नाहीतर हा निलेश राणे तुमची घमंड उतरविल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही निलेश राणे यांनी दिला आहे.

कोणी त्यांच्या व्यक्तिगत जीवनात काय करावे हा त्यांचा विषय आहे. पण जर आरोप झाले आहेत तर पोलिसांनी चौकशी केलीच पाहिजे. तसेच दुसरं, माहिती लपवणं निवडणूक आयोगानुसार गुन्हा समजला जातो आणि त्या गुन्ह्याखाली धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, अशी मागणी निलेश राणे यांनी केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.