लखनऊ – उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर येथे एका लग्नाच्या रिसेप्शनमध्ये सहभागी झालेला मुंबईतील रहिवासी निहाल खान याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. निहाल खान हा अंडरवल्र्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरचा मेहुणा होता. ही हत्या जुन्या वैयक्तिक वैमनस्यातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाआहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार आणि गुरुवारी मध्यरात्री त्यांच्या मेहुण्याच्या घरी आयोजित कार्यक्रमात निहाल खान (32) आणि त्याचा भाऊ कामिल यांच्यात वाद झाला. यानंतर भांडण वाढत गेले आणि रागाच्या भरात कामिलने त्याच्या परवाना असलेल्या बंदुकीतून आपल्या भावाचा गोळ्या झाडून खून केला, असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनोज कुमार अवस्थी यांनी सांगितले.
या घटनेमागे जुनी वैयक्तीक वैमनस्य असल्याचा संशय आहे. या घटनेनंतर फरार असलेल्या कामिलचाही पोलीस शोध घेत आहेत, असे अवस्थी यांनी सांगितले. दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून या प्रकरणाच्या तपासासाठी तीन पथके तयार करण्यात आली आहेत.