नवी दिल्ली – राजस्थानातील करणी सेनेचे प्रमुख सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने राजस्थान आणि हरियाणातील तब्बल ३१ ठिकाणी छापेमारी केली.
गृहमंत्रालयाने अलिकडेच या हत्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला आहे. या प्रकरणात काही बड्या गँगस्टर्सच्या समावेशाची शक्यता पुढे आल्यानंतरच हा तपास एनआयएकडे देण्यात आला आहे. काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांची चौकशी केल्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारावर छापेमारी करण्यात आली आहे.
सुखदेव सिंह गोगामेडी यांची ५ डिसेंबर रोजी त्यांच्या जयपूर येथी निवासस्थानीच गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. लॉरेन्स विष्णोई टोळीशी संबंधित गँगस्टर रोहीत गोदारा याने हत्येची जबाबदारी स्विकारली आहे. त्याने आपणच ही हत्या घडवून आणल्याची पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती. प्राप्त माहितीनुसार हत्येच्या काही दिवस अगोदरच गोदाराने दुबईतील एका नंबरवरून फोन करत गोगामेडी यांना धमकी दिली होती.
दरम्यान, या हत्या प्रकरणात पोलिसांनी शूटर रोहीत राठोड, नितीन फौजी आणि त्यांचा साथीदार उधम यांना १० डिसेंबर रोजी चंदीगड येथून अटक केली आहे. याखेरीज हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली जयपूर पोलिसांनीही एकाला अटक केली आहे. रामवीर जाट याने आपला मित्र फौजी याच्यासाठी हत्येच्या संदर्भात मदतीसाठी जयपूर येथे तयारी केली होती असे पोलिसांचे म्हणणे आहे.
गोळीबार करणारे अर्थात शूटर गोदाराचे साथीदार वीरेंद्र चौहान आणि दानाराम यांच्या संपर्कात होते. त्यांच्या आदेशानुसारच गोगामेडीची हत्या करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या गोळीबारात गोगामेडीवर हल्ला करणारा नवीन शेखावत मारला गेला आहे.