सुटलेल्यांना पकडण्यासाठीच ‘एनआयए’कडे तपास : आठवले

पुणे – काही लोकांना वाचवण्यासाठी नव्हे, तर वाचलेल्यांना पकडण्यासाठी एल्गार परिषद प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवण्यात आल्याचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी येथे स्पष्ट केले.

शनिवार पेठेत रिपाइंच्या नव्या मध्यवर्ती कार्यालयाचे आणि कायदेशीर मागदर्शन केंद्राचे उद्‌घाटन आठवले यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पश्‍चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष परशुराम वाडेकर, निमंत्रक ऍड.मंदार जोशी शहराध्यक्ष अशोक शिरोळे उपस्थित होते.

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी मोहिमेबाबत शिवसेनेची भूमिका अत्यंत कलूषित झाली आहे. बांगलादेशी व पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून लावणाऱ्या या दोन्ही कायद्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समर्थन केले पाहिजे, परंतू कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दबावामुळे ते भूमिका घेत नाहीत, अशी टीका आठवले यांनी केली.

बांगलादेशी आणि पाकिस्तान घुसखोरांविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका योग्य असून ते सीएए व एनआरसीच्या पाठिंब्यासाठीच अप्रत्यक्षपणे मोर्चा काढत आहेत. हा कायदा नागरिकत्व हिरावणारा नाही, असेही आठवले यांनी सांगितले. अर्थसंकल्प हा देशाला आर्थिक परिवर्तनाच्या दिशेने नेणार आहे. त्यातील योजनांचा फायदा महाराष्ट्रालाच होणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.