पुणे – पुणे-पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी “एमएसआरडीसी’ने रिंगरोड प्रकल्प हाती घेतला आहे. एका बाजूला भूसंपादनाचे काम सुरू असताना दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष रिंगरोड तयार करण्याचा आराखडा निश्चित करण्याचे काम सुरू आहे.
पश्चिम रिंगरोड हा हा कळवडे (ता. भोर) ते उर्से (ता. मावळ) असा सुमारे 65 किलोमीटर लांबीचा असणार आहे. पश्चिम भागातील 14 गावांतील सुमारे साठ टक्के जागेचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. त्यामुळे या भागाचा रिंगरोड विकसित करण्यासाठीची निविदा प्रक्रिया महामंडळाकडून सुरू करण्यात आली आहे. डिसेंबरअखेरपर्यंत निविदा मागवून पुढील वर्षी या रस्त्याचे काम प्रत्यक्षात सुरू करण्याचे नियोजन “एमएसआरडीसी’कडून करण्यात आले आहे.
रिंगरोडचे पूर्व आणि पश्चिम रिंगरोड असे दोन भाग आहेत. पूर्व व पश्चिम रिंगरोडची एकूण लांबी 136 कि.मी. असून रुंदी सुमारे 110 मीटर इतकी असणार आहे. सध्यस्थितीत पश्चिम रिंगरोड काम गतीने सुरू आहे. या रिंगरोडला राज्य सरकारकडून “विशेष राज्य महामार्गा’चा दर्जा दिला आहे. रिंगरोड हा प्रकल्प राज्य शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळे हा प्रकल्प वेळेत होण्यासाठी रिंगरोडचे पाच टप्पे करण्यात आले आहे.
आठ बोगदे, तीन छोटे पूल, दोन मोठे पूल आणि खडकवासला धरणाच्या बॅकवॉटरवरुन अर्धा किलोमीटर लांबीचा मोठा पूल अशी कामे होणार आहे. त्यामुळे 65 कि.मी. लांबीचा रिंगरोडचे काम लवकर होण्यासाठी पाच टप्पे करण्यात आले असून, एकाच वेळी पाच टप्प्यातील रिंगरोडचे काम सुरू करण्याचा मानस “एमएसआरडीसी’च्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. पश्चिम रिंगरोडसाठी सुमारे 695 हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार असून भूसंपादनासाठी सुमारे 5 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
असा असणार रिंगरोडचा मार्ग
पुणे -मुंबई द्रुतगती महामार्गावरील उर्से (ता. मावळ) येथून सुरुवात परंदवाडी – धामणे – बेबडओहोळ – चांदखेड – पाचाणे (ता.मावळ) – पिंपळोली- केमसेवाडी -जवळ- पडळघरवाडी- रिहे – मातेरेवाडी – घोटावडे – अंबडवेट- भरे – कासारआंबोली – उरावडे – आंबेगाव – मारणेवाडी – मोरेवाडी – भरेकरवाडी – कातवडी (ता. मुळशी) – बहुली- भगतवाडी -सांगरुण – मांडवी बुद्रुक – मालखेड – वरदाडे – खामगाव मावळ – घेरा सिंहगड – मोरदरवाडी – कल्याण – रहाटावडे (ता. हवेली) – रांजे- कुसगाव -खोपी- कांजळे- केळवडे (ता. भोर) येथील पुणे -सातारा महामार्गाला जोडला जाणार आहे.