उज्ज्वला गॅस योजनेचा बोऱ्या वाजला

नागरिकांना सिलेंडर मिळेना : वितरण एजन्सीच्या नियोजनाचा अभाव

टाकवे – केंद्र सरकारकडून मोठा गाजावाजा करत उज्ज्वला गॅस योजना प्रत्यक्षात आणली. या योजनेचा सर्व सामान्य गरीब कुटुंबांना लाभही मिळाला आहे. परंतु, एजन्सीच्या नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांना सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे.

सर्वसामान्यांच्या घरात गॅस पोहोचावा, स्वयंपाक करताना महिलांना चुलीच्या धुरापासून मुक्ती मिळावी यासाठी केंद्र सरकारने स्वच्छ इंधन, बेहतर जीवन असे म्हणत प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना आणली. अवघ्या शंभर रुपयांचा या योजनेतून गॅसचे वाटप करण्यात आले. टाकवे बुद्रुक येथील बहुसंख्य नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला. परंतु, आता नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. टाकवे बुद्रुक येथे नव्याने सुरु करण्यात आलेल्या गॅस सिलेंडर वितरण करणाऱ्या एजन्सीच्या नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. परिणामी नागरिकांना गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

टाकवेमध्ये आठवड्यातून तीन वेळा सिलेंडरची गाडी येते. परंतु गाडीची वेळ निश्चित नसल्याने नागरिकांचा गाडीची वाट पाहण्यातच संपूर्ण दिवस वाया जात आहे. याबाबत टाकवे येथील नागरिकांनी संबंधित एजन्सीला अर्ज करून तक्रार दिली आहे. यामध्ये गाडी वेळेवर न येणे, सिलेंडर बुकींग करुनही न मिळणे, गॅस सिलेंडरच्या गाडी समवेत येणाऱ्या कर्मचाऱ्यांची कमतरता या तक्रारीचा उल्लेख केला. रवी असवले, संतोष काटकर, महेंद्र पाटील, चंद्रकांत मोरे, सहिंद्रा लोंढे, ऋषीनाथ कुटे, चंद्रकांत खरमारे, मारुती काकडे, देवराम असवले आदींनी तक्रारी अर्जावर स्वाक्षरी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.