‘गुगल पे’ वरुन पैसे देण्याऐवजी काढून घेतले

टायर विकत घेण्याच्या बहाण्याने विक्रेत्याची ऑनलाईन फसवणूक

पिंपरी – दुकानातील चार टायर विकत घ्यायचे असून त्यासाठी पैसे “गुगल पे’ या माध्यमातून पाठवतो असे सांगून पैसे देण्याऐवजी उलट विक्रेत्याच्याच खात्यावरील 69 हजार रुपये काढून फसवणूक केली. हा प्रकार बावधन येथील “टायर कॉटेज’ या व्यावसायिकासोबत घडला आहे.

याप्रकरणी, सुरज रवींद्र सपकाळ (वय- 23 रा. बावधन) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरुन अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी सुरज सपकाळ यांचे बावधन येथे टायर विक्रीचे दुकान आहे. आरोपीने त्यांच्या मोबाईलवर संपर्क करुन चार टायर विकत पाहिजे आहेत, त्याचे किती पैसे होतील असे विचारले. फिर्यादींनी रक्कम सांगितल्यानंतर पैसे ऑनलाईन पाठवतो व त्यांचा ड्रायव्हर गाडी घेऊन येईल त्याला टायर बसवून द्या, असे सांगितले.

त्यानुसार फिर्यादी यांचा “गुगल पे’ नंबर विचारुन घेतला व त्यावर “पे’ असा मेसेज आल्यानंतर क्‍लिक करण्यास सांगितले. त्यानुसार, फिर्यादींनी “गुगल पे’ वर “पे’ मेसेज आल्यानंतर क्‍लिक केले. त्यावेळी त्यांच्या खात्यावरील 69 हजार 600 रुपये स्वत:च्या खात्यात वळते करुन घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.