पुणे – महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) व डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे आणि पीएमडीटीएच्या संलग्नतेने आयोजित 25 हजार डॉलर पारितोषिक रकमेच्या केपीआयटी-एमएसएलटीए आयटीएफ महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत ऋतूजा भोसले, झील देसाई, वैदेही चौधरी या भारतीय खेळाडूंचे एकेरीतील आव्हान संपुष्टात आले. तर, दुहेरीत भारताच्या रिया भाटिया व रोमानियाच्या मिरीयम बियांका बुलगारु या जोडीने अंतिम फेरीत प्रवेश केला.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीच्या मुख्य ड्रॉच्या उपांत्यपूर्व फेरीत तिसऱ्या मानांकित ब्राझीलच्या लौरा पिगोस्सी हिने सातव्या मानांकित भारताच्या झील देसाईचा 6-4, 6-3 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. मागील आठवड्यात झीलने दिल्ली येथील 15हजार डॉलर टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. तसेच, या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठून 13 गुणांची कमाई केली आहे. त्यामुळे देशातील टेनिसपटूंच्या क्रमवारीत तिने चौथ्या स्थानावर झेल घेतली आहे.
संघर्षपूर्ण लढतीत ग्रेट ब्रिटनच्या सहाव्या मानांकित इमेली वेबली-स्मिथ हिने वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या वैदेही चौधरीचा 2-6, 6-4, 6-3 असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. वैदेही हिने इमेली वेबली-स्मिथला विजयासाठी चांगलेच झुंजवले. हा सामना 2 तास 32 मिनिटे चालला. युक्रेनच्या पाचव्या मानांकित मारियाना झकारल्युक हिने भारताच्या व चौथ्या मानांकित ऋतुजा भोसलेचा 7-5, 6-2 असा पराभव करून दिमाखात उपांत्य फेरी गाठली. दुसऱ्या मानांकित रोमानियाच्या मिरीयम बियांका बुलगारु हिने आठव्या मानांकित रशियाच्या इरिना क्रोमाचेव्हाचा टायब्रेकमध्ये 6-4, 7-6(6) असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली.
दुहेरीत उपांत्य फेरीत भारताच्या रिया भाटियाने रोमानियाच्या मिरीयम बियांका बुलगारुच्या साथीत सौजन्या बाविशेट्टी व प्रार्थना ठोंबरे या जोडीचा टायब्रेकमध्ये 6-2, 7-6(4) असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.