नवी दिल्ली – राजधानी दिल्लीतील हवेचे प्रदुषण खूपच वाढले असल्याने ते कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या प्रकृतीला मानवणारे नाहीं. त्यामुळे त्यांना काही काळासाठी दिल्ली सोडून अन्यत्र जाण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला असल्याने सोनिया गांधी या आता काही दिवसांसाठी दिल्ली सोडून अन्यत्र जाणार आहेत अशी माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली.
त्या गोवा किंवा चेन्नाईला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या समवेत राहुल गांधी किंवा प्रियांका गांधी या असणार आहेत.
सोनिया गांधी यांनी गेल्या ऑगस्ट मध्येच रूग्णालयातून घरी सोडण्यात आले असून तेव्हा पासून त्यांना मोठ्या प्रमाणावर औषधे घ्यावी लागत आहेत. त्यांच्या छातीत वारंवार संसर्ग होत असल्याचे लक्षात आले आहे, त्यामुळे सध्याच्या प्रदुषित हवेबद्दल डॉक्टरांनी त्यांच्या बाबतीत चिंता व्यक्त करीत त्यांना काही दिवसांसाठी दिल्लीच्या बाहेर जाण्याचा सल्ला दिला होता.
गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात त्या काहीं काळ गोव्यात राहायला गेल्या होत्या.