हडपसर –भोंग्याचा त्रास त्यांना पंधरा वर्षे झाला नाही, त्यांना भाऊ मुख्यमंत्री झाल्यावर त्रास सुरू झाला. राज्याचा मुख्यमंत्री शिवसेना ठरवेल, त्यांनी विरोधीपक्ष नेते म्हणून काम करावे, अशी राज ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करीत दोन दिवसांत आरोपपत्र दाखल होऊन पुढील पाच दिवसांत सोमय्या जेलमध्ये जाणार असल्याचे सांगत शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.
शिवसेना हडपसर मतदारसंघाच्या वतीने शिवसेना नेते संजय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली माळवाडी रोड येथे जाहीर मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी राऊत बोलत होते. माळवाडी येथील शिवसेना कार्यालयाचे उद्घाटन राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी झालेल्या सभेत पुणे शहर, उपनगर तसेच जिल्ह्यातील विविध भागातून शिवसैनिक उपस्थित होते. शिवसेना नेते राऊत यांची ही सभा गाजणार अशी चर्चा असताना ते काय बोलणार याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले होते. शिवाय, स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीबाबतच्या सुचनेही उत्स्कुता होती.
यावेळी शिवसेना नेत्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, संपर्क प्रमुख सचिन आहीर, आदित्य शिरोडकर, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी मंत्री विजय शिवतरे, जिल्हा प्रमुख विजय देशमुख, रमेश कोंडे, बाळासाहेब चांदेरे, संजय मोरे, समीर तुपे, राजेंद्र बाबर, नगरसेवक प्रमोद भानगिरे, प्राची अल्हाट, संगिता ठोसर, पल्लवी जावळे, पृथ्वीराज सुतार, माजी आमदार महादेव बाबर, चंद्रकांत मोकाटे, शंकरनाना हरपळे, राजाभाऊ होले, तानाजी लोणकर, प्रा. विद्या होडे, शादाब मुलाणी, महेंद्र बनकर आदी उपस्थित होते. समीर तुपे यांनी प्रास्ताविक केले तर नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी आभार मानले.
पुणे पालिकाही जिंकायची…
भोंग्याचे राजकारण सध्या सुरू आहे. बाळासाहेबांनी मुस्लीम बांधवांसाठी जागा उपलब्ध करून देत रस्त्यावरील नमाज बंद केले. आपण जेंव्हा समस्या निर्माण करता तेंव्हा त्यावरील उपायही देणे गरजेचे आहे. भोंगे प्रकरणात या लोकांनी आमच्या हिंदूंचाच गळा आवळला आहे. महापालिकेच्या पायरीवर आमची मनगटे कमी नाहीत हे शिवसैनिकांनी दाखवून दिले आहे. पालिका निवडणूकीचा संदर्भ देत खासदार राऊत यांनी आता केवळ मुंबई, ठाणे नाही तर पुणे पालिकाही जिंकायची आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.