पिरंगुट – संधीचे सोनं कसं करायचं याच उत्तम उदाहरण हसन मुश्रीफ आहेत. कागल मतदार संघाच्या जडणघडणीत मुश्रीफ यांचे मोठे योगदान आहे. मुश्रीफ यांनी सत्तेचा उपयोग हा शेवटच्या घटकांपर्यत केला. जो काम करतो लोक त्याला मतदान करतात. शिवछत्रपतींचा आदर्श समोर ठेवणारे मुश्रीफ यांचा आज सन्मान झाला, याचा आनंद होत आहे, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
भूगाव (ता. मुळशी) येथे सह्याद्री प्रतिष्ठान मुळशी यांच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना शिवस्वराज्य भूषण पुरस्कार शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
या वेळी अशोक मोहोळ, प्रदीप गारटकर, अंकुश काकडे, दिंगबर दुर्गाडे, सुनिल चांदेरे, रविकांत वर्पे, रामभाऊ ठोंबरे, राजाभाऊ हगवणे, सविता दगडे, महादेव कोंढरे, शांताराम इंगवले, सचिन घोटकुले, बाळासाहेब चांदेरे, रवींद्र कंधारे, सचिन खैरे, अमित कंधारे, दगडूकाका करंजावणे, सागर साखरे, सरपंच वनिता तांगडे, अंकुश मोरे, कोमल वाशिवले, राधिका कोंढरे, स्वाती हुलावळे, अंजली कांबळे, निकिता सणस तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
यानिमित्त जिल्हा परिषदेचे माजी गटनेते शांताराम इंगवले, शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक अमित गायकवाड, पत्रकार संघ मुळशीचे अध्यक्ष नीलेश शेंडे यांचा शरद पवार यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, पवार साहेबांच्या हस्ते सत्कार होणे जीवनातील भाग्याची गोष्ट. आयुष्याची जडणघडण साहेबांच्या देखरेखेखाली झाली. प्रास्ताविकात सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल पवार म्हणाले की, 6 जून 2017 पासून शिवस्वराज्य दंड उभारून पुणे जिल्ह्यात 1700 ग्रामपंचायतीत शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. या सरकारने घेतलेला निर्णय कौतुकास्पद असून हा निर्णय कधीही न संपणारा आहे.