बारामती – बारामती शहर पोलीस ठाण्याच्या अभिलेखा वरील कुख्यात गुंड रोहित केशव जगताप (वय 28, रा. कसबा, बारामती) याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. पीडित निर्भयाने कोणतीही तमा न बाळगता पोलीस स्टेशन गाठून बलात्कार केल्याची हकिगत सांगितली. पोलिसांनी महिलेचा जबाब तात्काळ नोंदवून रोहित जगतापला ताबडतोब उचलून आणून त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली.
या आरोपीने बारामतीमधीलच या पीडित महिलेसह तिच्या मुलाचे अपहरण करून मारून टाकण्याची धमकी दिली होती. तिला कोणी जवळचे नातेवाईक नाही हे पाहून व स्वतःची असणारी दहशत या जोरावर मोरगाव रोडच्या सिकंदर नगर भागात त्याठिकाणी काटेरी झुडपांमध्ये तिच्यावर सोमवारी (दि. 6) दुपारी बारा वाजता लैंगिक अत्याचार केला.
तेवढ्यावर न थांबता ही निर्भया ज्या ठिकाणी काम करते त्या ठिकाणी येऊन परत त्या ठिकाणी गोंधळ करून शरीरसंबंधांची मागणी केली. तिने त्यास नकार दिला असता तिच्या घरी जाऊन दरवाजाची तोडफोड केली.
या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, उपनिरीक्षक गणेश पाटील, युवराज घोडके तसेच पोलीस हवालदार शिंदे, इंगळे हे करीत आहेत. यापुढे कोणत्याही महिलेची कुणाविरुद्ध ही लैंगिक अत्याचाराची तक्रार केल्यास तात्काळ पोलीस स्टेशनची संपर्क करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे.