सातारा – जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून करोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला असून मार्च महिन्यात जिल्ह्यातील 48 हॉटस्पॉटमध्ये 2061 बाधित आढळून आले आहेत. सातारा, फलटण, कोरेगाव, खंडाळा, कराड तालुक्यांमध्ये बाधितांची संख्या वाढल्याने चिंतेत भर पडली आहे. प्रशासन कडक नियमांची अंमलबजावणी करत आहे, उपाययोजनांमध्येही कुठेही ढिलाई नसतानाही बाधितांची वाढती संख्या जिल्हावासियांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
बाधितांच्या संख्येत दि. 1 ते 30 मार्च या कालावधीत लक्षणीय वाढ झाली. त्यात तालुकानिहाय मोठी संख्या असणारी गावे किंवा भाग पुढील प्रमाणे आहे. खटाव ः वडूज 70, पुसेगाव 42, बुध,27, सातारा ः मंगळवार पेठ 44, शनिवार पेठ 30, गोडोली 54, सैनिक स्कूल 14, सदरबझार 81, शाहूपुरी 33, मतकर कॉलनी 12, पाडळी 17, नागठाणे 15, शेरेवाडी 11, खोजेवाडी 20, कोरेगाव ः कोरेगाव 138, देऊर 47, ल्हासुर्णे 16, अरबवाडी 34, पिंपोडे बुद्रुक 16, वाठार स्टेशन 47, रहिमतपूर 19, वाई ः बावधन 22, माण ः दहिवडी 92, म्हसवड 62, खंडाळा ः लोणंद 160, शिरवळ 145, पारगाव 25, खंडाळा 35, कराडः मलकापूर 58, शनिवार पेठ 46, सोमवार पेठ 18, रविवार पेठ 15, फलटण ः तरडगाव 144, सांगवी 32, विडणी 24, आदर्की 16, कोळकी 85, जाधववाडी 34, वाठार निंबाळकर 15, निंभोरे 18, साठेफाटा 19, कसबा पेठ 32, मलठण 32, रविवार पेठ 26, लक्ष्मीनगर 61, महाबळेश्वर ः घोणसपूर 11, पाटण ः विहे 30.
जिल्ह्यात गेल्या 30 दिवसांत हॉटस्पॉटमध्ये वाढ होण्याबरोबर बाधितांचे प्रमाणही वाढले आहे.
माण, खटाव तालुक्यात हॉटस्पॉट कमी झाले असले तरी खंडाळा, फलटण, कोरेगाव, सातारा, कराड तालुक्यात हॉटस्पॉटमध्ये झालेली वाढ जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील व त्यांचे सहकारी करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवून जिल्हावासियांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहेत.
कोट…
जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्यावतीने करोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांमध्ये विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. हॉटस्पॉट ठरलेल्या गावांमध्ये विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरुन न जाता प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करुन सहकार्याची गरज आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने करोना नियंत्रणासाठी शक्य ते प्रयत्न सुरु असून त्यास जिल्हावासियांचीही पूर्ण साथ मिळाली तर हे संकटही दूर होईल.
– डॉ. अनिरुध्द आठल्ये (जिल्हा आरोग्य अधिकारी, सातारा)