मुंबई – इंस्टाग्राम या सोशल मीडियावर भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा याला आव्हान देणारा भारताचा नवोदीत यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याचा चांगलाच समाचार घेत रोहितने त्याला ट्रोल केले आहे. भारतीय संघात स्थान मिळविल्याला अद्याप तुला एक वर्षही झाले नाही आणि तू मला कसले आव्हान देतोस, त्यापेक्षा आपल्या कामगिरीवर लक्ष दे, अशा शब्दात रोहितने पंतची विकेट काढली.
कोरोनाचा धोका वाढल्याने भारतीय क्रिकेटपटूही सध्या आपल्या कुटुंबाला वेळ देत आहेत. त्यातच यातील बरेच खेळाडू सध्या सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह आहेत. पंतने एका लाईव्ह चॅटवर रोहितला आव्हान देताना उत्तुंग षटकार मारुन दाखव अशा शब्दात आव्हान दिले होते.
रोहितला पंतने आव्हान दिल्याचे भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने सांगितले. त्यावेळी रोहितने ऑनलाईन येत पंतला चांगलेच टोमणे मारले. ही चर्चा अत्यंत खेळीमेळीत झाली असून त्याबाबत कोणी उगिच प्रतिक्रियांचे तारे तोडू नयेत असेही रोहितने फॉलोअर्सला सुनावले.
चहलवरही ताशेरे…
भारताचा लेगस्पिन गोलंदाज यजुर्वेंद्र चहलवरही रोहितने ताशेरे ओढले आहेत. चहल क्रिकेटपटू कमी तर टीकटॉक स्टार जास्त दिसतो, असे सांगत रोहितने त्याचीही विकेट काढली. चहल दक्षिणेतील अभिनेता विजय राज याच्यासारखाच दिसतो असेही रोहितने आपल्या कमेंटमध्ये सूचित केले व त्याला चाहत्यांनी प्रचंड लाईक केले.