लंडन: करोना विषाणूशी संबंधित अनेक अफवा आणि अंधश्रद्धा सध्या पसरायला लागल्या आहेत. युरोपात काही नव्या अफवा पसरायला लागल्या आहेत. त्यातील एक म्हणजे “5-जी’ मोबाईलच्या टॉवरमधून करोना विषाणूंचा फैलाव होतो, असा समज पसरू लागला आहे. सोशल मिडीयावर कोणत्याही शास्त्रीय आधार नसलेली ही अफवा इतकी पसरली आहे, की लीव्हरपूल आणि बर्मिंगहॅम या शहरांमधील 5-जी टॉवरवरच नागरिकांनी हल्ले करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे 5-जी मोबाईलचे नेटवर्कच खंडीत होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
बर्मिंगहॅममध्ये 5-जी मोबाईलचा 70 फूट उंच नेटवर्क टॉवरच नागरिकांनी पेटवून दिला. मोबाईल इंजिनिअर हे नेटवर्क पुन्हा व्यवस्थित करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. 5-जी नेटवर्कच्या विरोधात अशी चिथावणीखोर पोस्ट फेसबुकवरूनही केली जायला सुरुवात झाली आहे. अशा पोस्ट करणाऱ्या गटांना फेसबुकने हटवले आहे. करोनाच्या निमित्ताने 5-जी नेटवर्कविरोधात एक कारस्थान केले जात असल्याचा आरोप अधिकाऱ्यांनी केला आहे.
दुसरीकडे करोनाचा फैलाव रोखण्यासाठी “सोशल डिस्टन्सिंग’चे आवाहन जगभरात केले जात आहे. पण आजच्या “पाम संडे’पासून सुरू होणाऱ्या पवित्र आठवड्यासाठी चर्च खुली ठेवून प्रार्थनेसाठी एकत्र येण्यावर सिनसिनाटीतील भाविक ठाम आहेत. चर्च बंद करावीत यासाठी महापौर आणि आरोग्य अधिकाऱ्यांनीही आग्रह धरला आहे. मात्र त्याला अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. करोनाचा विषाणूच्या निमित्ताने प्रार्थनेपासून भाविकांना दूर ठेवणे हा सैतानाचा प्रयत्न आहे. देवाकडून दैवी तत्व पसरवले जाणार असल्याने चर्चमध्ये जाण्यावर शेकडो भाविक ठाम आहेत. त्यासाठी सरकारने घातलेले निर्बंध झुगारून देण्यासही हे भाविक तयार आहेत. यामुळे करोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची भीती आहे.