अमरापूरच्या रेणुकामाता देवस्थानात नवरात्रोत्सवास पारंपारिक पद्धतीने प्रारंभ

Madhuvan

शेवगाव- श्रीक्षेत्र अमरापूर च्या श्री रेणुका माता देवस्थानात शारदीय नवरात्र उत्सवास पारंपारिक पद्धतीने प्रारंभ होऊन घटस्थापना करण्यात आली. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सध्या देवस्थाने बंद असल्याने येथेही  देवस्थानाच्या मंदिराचा मुख्य दरवाजा बंद असून मंदिराच्या आत प्रवेशास  बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे भाविक मंदिरा बाहेरूनच कळसाचे दर्शन घेत आहेत.

दरवर्षी येथे शेकडो माहिला  घटी बसतात त्या सर्वांचा यंदा हिरमोड झाला. काल दिवसभर पंचक्रोशीतील अनेक देवस्थानांनी  येथून ज्योत पेटवून नेली.

शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त येथील श्री रेणुका माता  देवस्थानातील  नवरात्रोत्सवासाठी  स्वर्गीय योगेश भालेराव हे स्वतः दरवर्षी ३५ भाविकासमवेत  साडेचारशे किलोमीटरचा पायी प्रवास करून श्रीक्षेत्र माहूरहून ज्योत आणत.   यंदा त्यांचे स्मृतीला आभिवादन करुन  पांडुरंग देवकर,  राजेंद्र नांगरे, अश्वलिंग जगनाडे व गणेश गाढे या चार भाविकांनी मोठ्या टेम्पोमधून ज्योत आणली आहे.

यावर्षी करोना मुळे  मंदिराच्या आतल्या आत आई साहेबांच्या रोजच्या नियमीत पूजा विधी होत आहेत.  नवरात्रोत्सवा निमित  काल शनिवारी ( दि१७ )सकाळी ७ ला श्री रेणुका मातेला रुद्राभिषेक घालून  आठ वाजता  शास्त्र संपन्न सचिन  देवा यांनी यज्ञमंडपात नवचंडी यागास प्रारंभ केला आहे. तर ११वाजता अॅड . नितीन भालेराव यांचे हस्ते घटस्थापना करण्यात आली.

साडे अकराला  आरती करण्यात आली. यावेळी जोग महाराज संस्कार केंद्राचे प्रवर्तक राम महाराज झिंजूर्के,  देवस्थानाच्या प्रमुख रेणुका भक्तानुरागी मंगलताई भालेराव, प्रशांत नाना, जयंती भालेराव, रेणुका व प्रज्ञेश भालेराव ,भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रामदास गोल्हार, एकनाथ कुसळकर, शिवाजीराव भुसारी, प्रा. जनार्दन लांडे पाटील अशी मोजकी मंडळी आरतीला सोशल डिस्टन्सिग पाळत उपस्थित होती. सायंकाळी साडेपाचला राजोपचार,  साडेसहाला महा आरती झाली.

सायंकाळी शेवगाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी देवस्थानाला भेट देवून व्यवस्थेची पहाणी केली. नवरात्रोत्सवात दररोज सप्तशती पाठ, तर प्रत्येक माळेला तुषार देवा व जोशी देवा कुंकुमार्चन ,हरीद्रार्चन, कमलार्चन, हिरण्यार्चन बिल्वार्चन, एलार्चन, शमी पत्रार्चन, अशी वेगवेगळी पुजा बांधणार आहेत.

पुढील शनिवारी ( दि२४ ) पहाटे पाचला हवनास सुरवात होवून सकाळी ११ला पूर्णाहूती व साडेअकराला महाआरती तर रविवारी ( दि २५ ) सकाळी आठ ला महापूजा व सायंकाळी पाच ला परशुरामांची पालखी व सीमोलंघन करुन  उत्सवाची सांगता होणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.