पुणे पोलीस आयुक्तालयात ‘मंत्रायल स्टाईल’

आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या सूचनेनुसार फाईल निपटारासाठी प्रशासकीय पद्धत

पुणे – पुणे पोलीस आयुक्तालयातंर्गत दाखल केलेल्या फायलींचा लवकर निपटारा करण्यासाठी आता मंत्रालयासारखी पद्धत ठरविण्यात आली आहे. त्यानुसार फाईल थेट संबंधित अधिकाऱ्यांच्या टेबलावर ठेवली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या विविध कार्यक्रमांच्या परवानग्यासह, पोलीस कर्मचाऱ्यांच्या फायलींचा लवकर निपटारा होणार आहे. तसेच, यानिमीत्त होणारी काही चुकीची प्रॅक्‍टीसही टाळली जाणार आहे.

पुढील काही दिवसांत फाईलींचे ट्रॅकींगही केले जाणार आहे. यामुळे पोलीस आयुक्तालयातील तथाकथीत बाबूंचा त्रास सर्वसामान्यांना होणार नाही. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या सूचनेनुसार ही पध्दत राबवली जाणार आहे. अमिताभ गुप्ता यांना मंत्रायलयातील प्रशासकीय कामाचा अनुभव आहे. यासाठी मंत्रायलयातील कामाचा अनुभव असलेल्या एका महिला सहाय्यक आयुक्तांची मदत घेतली जात आहे.

शहरातील नागरिकांकडून विविध कार्यक्रमांसह वाहतूकीच्या संदर्भातील वेगवेगळ्या परवानगीसाठीच्या अर्ज आणि फाईल पोलीस आयुक्तालयात जमा करण्यात येतात. मात्र, संबंधीत विषयांच्या फाईली थेट त्या अधिकाऱ्यांकडे न जाता, ज्याच्याशी विषय संबंधीत नाही त्यांच्या टेबलावरही फिरत होत्या. त्यामुळे किरकोळ परवानगीसाठी अनेकांना काही आठवडे ते महिन्याभराची वाट पाहावी लागत होती. यामुळे पोलीस आयुक्तालयात फाईल कोणाच्या टेबलवर आली आहे, हे पाहण्यासाठी नागरिकांचा वावर वाढत होता. यातूनच फाईल हलवण्यासाठी काही चुकीच्या पध्दतीचा वापरही केला जात होता.

आता, पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार ज्या-त्या विषयांची फाईल त्या-त्या संबंधित अधिकाऱ्यांकडे थेट पाठविली जाणार आहे. यामध्ये गणेशोत्सव, नवरात्रोत्सव,

दिवाळी, विविध मिरवणूका, राजकीय सभांच्या परवानगीसाठी पोलीस आयुक्तालयात दाखल केलेल्या फाईलींचाही समावेश असणार आहे. त्याशिवाय पोलीस कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी, मेडीक्‍लेम, सेवानिवृत्ती फंड संदर्भातील सर्व फायलींना तातडीने क्‍लेअर करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले आहे.

फायलींचा निपटारा करण्यासाठी तीन ते चार दिवसांचा कालावधी निश्‍चित करण्यात आला आहे. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांकडे फाईल पाठविली जाणार असून तातडीने कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे आता विविध परवानग्या सोपस्कररित्या पूर्ण होणार आहेत. भविष्यात फाईल ट्रॅकिंगची यंत्रणाही कार्यान्वित केली जाणार आहे. अशी प्रतिक्रिया डॉ. जालींदर सुपेकर (अपर पोलीस आयुक्त, प्रशासन) यांनी दिली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.