पुणे – महापालिका निवडणुकांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी आघाडीत निवडणुका लढविण्याची मागणी करीत असताना, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मात्र स्वबळावर निवडणूक लढविण्याचा नारा दिला. बालगंधर्व येथे गुरुवारी (दि. 10) झालेल्या पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत विविध सेलच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ही निवडणूक स्वबळावर लढविण्याची मागणी केली. त्यावेळी याबाबतचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार घेतील, यावर शिक्कामोर्तब झाले.
प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर पालिका निवडणुकीसाठी पक्षांकडून बैठका सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज बालगंधर्व येथे सर्व सेलची बैठक घेतली. त्यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वबळाचा नारा दिला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे, महापालिका विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, रवींद्र माळवदकर, प्रदीप देशमुख यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सर्व सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
महापालिका निवडणूक एप्रिल ते मे 2022 मध्ये होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली. यावेळी निवडणूक आघाडी करून लढवायची की स्वबळावर, याबाबत सेलच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना स्टेजवरून विचारण्यात आले. त्यावेळी बहुतांश सेलच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकच कल्ला करीत स्वबळाचा नारा दिला. परंतु, यावर अजित पवार अंतिम निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.