fbpx

गांजा विकायला आलेले दोघे अटक ; दोन लाखांचा गांजा जप्त

पुणे – दुचाकीवरुन गांजा विकायला आलेल्या दोघा तरुणांना गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून सहा किलो 200 ग्रॅम गांजा जप्त केला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण संभाजी बिडगर(25,रा.दिघी) व शुभम संजय सोनवणे(24,रा.सोलापूर) अशी आरोपींची नावे आहेत. यातील बिडगर हा वाहनचालक आणी सोनवणे हा बिगारी आहे.

गुन्हे शाखा युनिट एकचे पथक पोलिस आयुक्तांनी दिलेल्या आदेशानूसार सराईत, तडीपार आणी वॉन्टेड गुन्हेगारांचा शोध घेत होते. दरम्यान रविवारी हे पथक कात्रज परिसरात गस्त घालत होते. तेव्हा पोलिस नाईक अमोल पवार यांना दुचाकीवरुन दोन तरुण गांजा विकायला येणार असल्याची खबर मिळाली.

त्यानूसार एका वृत्तपत्राच्या प्रिटींग प्रेस समोरील पान टपरीवर दोन संशयीत व्यक्ती दुचाकीवर थांबलेल्या आढळल्या. त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता, गाडीवर एक पोते आढळले. त्यांना पोत्यातील वस्तू संदर्भात विचारणा केली असता, त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. यामुळे पोते उघडले असता, त्यामध्ये सहा किलो 200 ग्रॅम गांजा सापडला. त्यांच्यावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. त्यांच्याकडून गांजा व दुचाकी असा दोन लाखाचा ऐवज हस्तगत करण्यात आला.

ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चनसिंग, सहायक पोलिस आयुक्त सुरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल ताकवले, उपनिरीक्षक संजय गायकवाड, हनुमंत शिंदे, सुनिल कुलकर्णी, पोलिस अंमलदार अमोल पवार, अजय थोरात, इम्रान शेख, प्रशांत गायकवाड, महेश बामगुडे, अय्यज दड्डीकर, तुषार माळवदकर यांच्या पथकाने केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.