पृथ्वीराज चव्हाण व उंडाळकर गटांच्या मनोमिलनाचा मुहूर्त ठरला

दि. 6 नोव्हेंबरला प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत कराडला काँग्रेस मेळावा : डॉ. सुरेश जाधव

कराड –  काँग्रेस विचारधारे बरोबर होतो, आहे आणि भविष्यातही राहणार, असा निर्णय घेत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण व माजीमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या गटांनी एकत्रित येण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

प्रदेशाध्यक्ष महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, ना. सतीश उर्फ बंटी पाटील, ना. विश्वजीत कदम यांच्यासह आ. पृथ्वीराज चव्हाण व माजीमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्यासह प्रमुख काँग्रेस पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शुक्रवार दि. 6 रोजी कराड येथील पंकज हॉलवर दुपारी 2.30 वाजता जिल्हा काँग्रेस पदाधिकार्‍यांचा मेळावा होणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, कराड दक्षिणचे अध्यक्ष मनोहर शिंदे, कराड शहरचे अध्यक्ष राजेंद्र माने व रयत संघटनेचे अध्यक्ष प्रा. धनाजी काटकर यांनी दिली.

कराड येथील काका-बाबा गटाच्या ऐतिहासिक मनोमिलन व काँग्रेस मेळाव्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे, नगरसेवक इंद्रजित गुजर, इंद्रजित चव्हाण, मलकापूरचे बांधकाम सभापती राजेंद्र यादव, माजी नगराध्यक्ष मोहन शिंगाडे उपस्थित होते.

डॉ. सुरेश जाधव म्हणाले, देशाला दिशा देणारी काँग्रेसची विचारधारा आहे. या विचारधारेबरोबर राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण व माजीमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्यासह त्यांच्या कुटुुंबीयांची बांधिलकी राहिली आहे. काका आणि बाबा गटात समेट व्हावा आणि जिल्ह्यासह राज्यातील काँग्रेसला बळकटी मिळावी ही सर्व काँग्रेस कार्यकत्यांची इच्छा होती आणि आहे. जिल्ह्यातील काँग्रेस बळकटीकरणासाठी हा निर्णय दोनही नेत्यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे येत्या दोन महिन्यात जिल्ह्यात अनेक बदल दिसून येतील.

प्रा. धनाजी काटकर म्हणाले, काका आणि बाबा गटाच्या नमोमिलनात ना. सतेज उर्फ बंटी पाटील व मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांची मोठी भूमिका राहिली आहे. सातारा येथे काकांच्या निवासस्थानी काका-बाबा यांची पाहिली भेट झाली. त्यावेळी काँग्रेसला ताकद देण्यासाठी काका-बाबा गटाच्या मनोमिलनावर चर्चा झाली. त्यावेळी काँग्रेसच्या भल्यासाठी माझी कोणतीही अडचण नसल्याचे विलासकाकांनी स्पष्ट केले होते. यावेळी कोणत्याही पदाशिवाय फक्त काँग्रेस पक्षासाठी काम करण्याचा निर्णय काका आणि अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांनी घेतला आहे.

मनोहर शिंदे म्हणाले, गेल्या काही वर्षात काका-बाबा गटांनी एकत्रित येत एका विशिष्ट ताकदीला रोखण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवल्या आहेत. तसेच या दोनही नेत्यांनी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती, मलकापूर नगरपालिका, कराड नगरपालिकेतही सर्वसामान्य कार्यकत्यांना काम करण्याची संधी दिली आहे. काँग्रेसच्या मजबुतीकरणासाठी मनाने एकत्रित आलेली ही मंडळी आहेत. काका-बाबा गटाच्या मनोमिलनाने सर्व सामान्यांना मोठी ताकद मिळणार आहे.

पुस्तकातील सर्व पाने परततील….
कराड नगरपालिकेत बाबागटाला सोडून गेलेले 16 पैकी 15 नगरसेवक परत आलेतर त्यांना स्विकारणार का? या प्रश्नावर बोलताना डॉ. सुरेश जाधव म्हणाले, काँग्रेस पक्ष वाढीसाठी आमचा प्रयत्न राहणारच आहे. तो फक्त कराड पुरता मर्यादित नसून संपूर्ण जिल्ह्यात काका-बाबा गटाच्या मनोमिलनानंतर आपल्याला बदल दिसून येईल. दरम्यान, पुस्तकाचे कव्हर सोडून सर्व पाने भविष्यात परततील, असे सूचक विधान इंद्रजित चव्हाण यांनी कराडमधील नगरसेवकांच्या अनुषंगाने केले.

तसेच काँग्रेस सोडून गेलेल्या आणि काका-बाबा गटाच्या मनोमिलनात मिठाचा खडा टाकणार्‍यांना पुन्हा काँग्रेस पक्ष प्रवेश देणार का? या प्रश्नावर बोलाताना डॉ. जाधव म्हणाले, पक्षवाढीसाठी आम्ही सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. यावेळी योग्य वेळ आणि काळ यायला हवा, असे मनोहर शिंदे यांनी स्पष्ट केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.