शारजा – कॅरन पोलार्डने अखेरच्या षटकांमध्ये केलेल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात 8 बाद 149 अशी समाधानकारक धावसंख्या उभारली.
Innings Break!#MumbaiIndians post a total of 149/8 on the board. Will @SunRisers chase this down?#Dream11IPL pic.twitter.com/oBX3Lst9Kq
— IndianPremierLeague (@IPL) November 3, 2020
हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने नाणेफेक जिंकत मुंबईला प्रथम फलंदाजी दिली. या सामन्यासाठी मुंबईचे नेतृत्व नियमित कर्णधार रोहित शर्मानेच केले. मुंबईच्या डावाची सुरुवातच खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा केवळ 4 धावांवर बाद झाला. त्यानंतर ठरावीक अंतराने त्यांचे फलंदाज बाद होत गेले.
कॉन्टन डीकॉक 25, सूर्यकुमार यादव 36 व इशान किशन 33 यांनी उपयुक्त खेळी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोठी धावसंख्या उभारण्यात त्यांना अपयश आल्याने त्यांचा डाव 7 बाद 116 असा अडचणीत आला होता. त्याचवेळी कॅरन पोलार्डने अचानक आक्रमक खेळ केला. त्याने 19 व्या षटकांत 3 षटकार फटकावले. तसेच अखेरच्या षटकांतही त्याने आक्रमक फटकेबाजी केली. मात्र, त्याला अर्धशतक पूर्ण करता आले नाही. तो 41 धावांवर जेसन होल्डरच्या चेंडूवर त्रिफळाबाद झाला.
त्याने 25 चेंडूंचा सामना करताना 2 चौकार व 4 षटकार फटकावले. त्याच्या फलंदाजीच्या जोरावर मुंबईने 8 बाद 149 अशी समाधानकारक धावसंख्या उभारली. हैदराबादकडून संदीप शर्माने 3 गडी बाद केले. त्याला योग्य साथ देताना जेसन होल्डर व शाहबाज नदीम यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक – मुंबई इंडियन्स – 20 षटकांत 8 बाद 149 धावा. (सूर्यकुमार यादव 36, इशान किशन 33, कॉन्टन डीकॉक 25, कॅरन पोलार्ड 41, संदीप शर्मा 3-34, शाहबाज नदीम 2-19, जेसन होल्डर 2-25).