नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रविवारी अयोध्येतील राम मंदिरात ‘पूजा’ करणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. रविवारी संध्याकाळी मंदिराच्या भेटीदरम्यान ते ‘दीपोत्सव’ आणि ‘आरती’ समारंभांना देखील उपस्थित राहतील आणि राम मंदिराच्या सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी करतील.
त्या दिवशी शरयू नदीच्या काठावर ग्रीन आणि डिजिटल फटाक्यांची आतषबाजीही केली जाणार असून त्यालाही पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत असे सांगण्यात येते. मोदी शुक्रवारी उत्तराखंडमधील केदारनाथ आणि बद्रीनाथ येथील प्रसिद्ध मंदिरांनाही भेट देण्याची शक्यता आहे.
मंदिरांमध्ये पूजा करण्यासोबतच ते दोन प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांच्या विकासकामांचीही पाहणी करणार आहेत. अयोध्येत अलीकडच्या काळापासून शरयू तिरावर तसेच तेथील नियोजित राम मंदिराच्या परिसरात दीपोत्सव मोठ्या प्रमाणात आयोजित केला जातो.