पुणे – प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे नुकतेच वितरण झाले असून राज्यातील 97 लाख पात्र शेतकऱ्यांपैकी 85 लाख शेतकऱ्यांनाच प्रत्यक्षात लाभ मिळाला, 12 लाख शेतकरी पात्र असूनही भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत नसणे, ई-केवायसी नसणे तसेच बॅंक खात्याशी आधार संलग्न नसणे, या तीन कारणांनी वंचित राहिले आहेत. त्यांना लाभ मिळावा यासाठी 15 ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
या मोहिमेंतर्गत प्रत्येक तालुका स्तरावर तहसीलदार, भूमिअभिलेख अधिकारी आणि कृषी अधिकारी यांची संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली असून त्यांच्या देखरेखीखाली गाव पातळीवर ग्रामसेवक, तलाठी व कृषी सेवक यांनी वरील तीन अटींमुळे लाभापासून वंचित राहिलेले शेतकरी शोधून तीनही अटींची पूर्तता करायची आहे, असे मुंडे यांनी सांगितले.