नवी दिल्ली – सार्वजनिक इंधन कंपन्यांनी गुरूवारी लिटरमागे पेट्रोलच्या दरात 23 पैशांची, तर डिझेलच्या दरात 26 पैशांची वाढ केली. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या दरवाढीमुळे दिल्लीत पेट्रोल, तर मुंबईत डिझेल दराने आजवरचा उच्चांक गाठला.
सार्वजनिक कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या इंधनांच्या किमती आणि इतर बाबींचा विचार करून दरदिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा आढावा घेतात. त्यानुसार, प्रत्येक दिवशी दर बदलतात किंवा जैसे थे राहतात. जवळपास महिनाभर पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये बदल करण्यात आले नव्हते.
मात्र, बुधवारी त्या इंधनांचे दर अनुक्रमे 26 आणि 25 पैशांनी वाढवण्यात आले. दुसऱ्या दिवशीही दरवाढ झाल्याने दिल्लीत पेट्रोलचा दर 84 रूपये 20 पैसे, तर डिझेलचा दर 74 रूपये 38 पैसे इतका झाला आहे. याआधी 4 ऑक्टोबर 2018 या दिवशी दिल्लीत पेट्रोलच्या सर्वांधिक दराची (84 रूपये) नोंद झाली. मुंबईत पेट्रोलचा दर 90 रूपये 83 पैसे, तर डिझेलचा दर 81 रूपये 7 पैशांवर पोहचला आहे.