नागपुर – नागपुरात साखळ्या हिसकावणाऱ्या सात जणांच्या आंतरराज्य टोळीला पोलिसांनी अटक केली असून सर्व आरोपींच्या विरोधात कठोर अशा मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
या टोळीने नागपुर, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापुर, चंद्रपुर आणि धुळ्यात एकूण 26 गुन्हे केले आहेत. या टोळीतील गुंडांनी दिल्लीतही अशाच प्रकारचे गुन्हे केल्याचे वृत्त आहे. अटक करण्यात आलेले हे सातही जण 19 ते 52 या वयोगटातील आहेत.
यातील पाच आरोपींना नागपुरात अटक करण्यात आली असून यातील दोन आरोपींना अशाच गुन्ह्यांमध्ये कोल्हापुरात अटक करून त्यांना तेथील मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.
या सातही जणांवर एकत्रितपणे मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ही टोळी साखळी हिसकावण्याच काम संघटीतपणे करीत असे.