पुणे – बाजरीच्या शेतामध्ये एका तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. ही घटना लोणीकंद येथील आव्हळवाडी येथे घडली. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी उमेश आव्हाळे (39) हे गावचे पोलीस पाटील आहेत. त्यांना गावातील राजेश घुले यांच्या बाजरीच्या शेतात एका 40 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह पडल्याची खबर मिळाली. त्यानूसार लोणीकंद पोलिसांना याची खबर देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पहाणी केली असता, मृतदेहाची ओळख पटली.
विष्णु सुनिल दास( 40,रा.गणेशनगर, वाघोली, मुळ कलकत्ता) असे मृताचे नाव आहे. तो कामधंद्यासाठी पुण्यात आला होता. त्याच्या खूनाचे कारण अद्यापही समजू शकले नाही. त्याला दगडाने ठेचून जीवे ठार मारण्यात आले आहे. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार करत आहेत.