नवी दिल्ली –भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीदेखील चर्चेत आला आहे. झारखंड क्रिकेट संघटनेच्या सदस्यत्वासाठी असलेले अठराशे रुपये धोनीने अद्याप दिले नसल्याने या चर्चेला सुरुवात झाली आहे.
धोनी झारखंड राज्य क्रिकेट संघटनेचे प्रतिनिधित्व करतो. गेल्या वर्षी संघटनेने त्याला आजीवन सदस्यत्व दिले. पण त्यासाठी जी मूळ रक्कम धोनीकडून संघटनेला मिळायला हवी होती त्यापेक्षा अठराशे रुपये कमी देण्यात आले आहेत. संघटनेतील गैरप्रकारांवर सातत्याने कारवाई करण्यासाठी आग्रही असलेले राज्याचे माजी राष्ट्रीय क्रिकेटपटू शेषनाथ पाठक यांनी धोनीची विनाकारण बदनामी होऊ नये यासाठी पैसे गोळा केले व ते संघटनेकडे डिमांड ड्राफ्टद्वारे भरण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो स्वीकारण्यास संघटनेने नकार दिला. संघटनेच्या गेल्या वर्षाच्या वार्षिक अहवालात धोनीच्या नावावर 1 हजार 800 रुपये येणेबाकी असल्याचे नोंदवले आहे.
संघटनेचे वार्षिक सदस्य शुल्क 10 हजार रुपये व त्यात 1 हजार 800 रुपये जीएसटी असे धरून एकूण 11 हजार 800 रुपये धोनीकडून येणे होते. संघटनेचा सदस्य धोनीकडे हे शुल्क घेण्यासाठी गेला असताना त्यांना 10 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला होता. त्यानेही जीएसटीचा उल्लेख केला नसल्याने धोनीच्या स्वीय सचिवाने ही रक्कम धरून नवा चेक दिला नाही. त्यामुळे ही थकबाकी धोनीच्या नावावर दिसत आहे. 10 हजार रुपये संघटनेकडे जमा झाले व आता जीएसटीचे 1 हजार 800 रुपये बाकी असून धोनीला त्याची कल्पना देण्यात आल्याचे संघटनेच्या एका सदस्याने सांगितले आहे.