आरोग्यमंत्री टोपे; राज्यभरात होणारे आंदोलन स्थगित
पुणे – करोनाकाळात स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णाला उपचार देण्यासाठी नर्स करोना वॉर्डात सज्ज असतात. मात्र, त्यांच्या सुरक्षिततेसाठी नर्सेस संघटनेकडून वारंवार होत असलेल्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे संघटनेकडून कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. तर मागील आठ दिवसांपासून काळी फीत लावून नर्सेस काम करत होत्या. याची दखल राज्य शासनाने घेऊन संघटनेच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन शासनाकडून दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे, अशी माहिती संघटनेच्या राज्य कोषाध्यक्षा व जिल्हा कार्याध्यक्षा वैशाली दुर्गाडे यांनी दिली.
राज्यामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत सुमारे 18 हजार नर्सेस ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात कार्यरत आहेत. महाराष्ट्र जिल्हा परिषद नर्सेस संघटना, पुणे यांनी विविध मागण्यांसाठी दि.1 ते 7 सप्टेंबरदरम्यान काळ्या फिती लावून आंदोलन सुरू करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संघटनेच्या पदाधिकारी मंडळाला चर्चेसाठी बोलाविले होते. त्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली असून नर्सेसच्या प्रश्नांवर विचार होऊन लवकरच प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या वैशाली नागवडे, राज्य संघटनेच्या अध्यक्षा शोभा खैरनार, सरचिटणीस लता पाटील, कोषाध्यक्षा वैशाली दुर्गाडे, विभागीय उपाध्यक्षा संगीता गुरव, विभागीय संघटक विजया गरुड उपस्थित होत्या. सध्या कोविड-19 या रोगाची साथ सुरू असल्याने ग्रामीण जनतेला सुरळीतपणे आरोग्य सेवा मिळावी, त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून संघटनेने शासनाच्या विनंतीला मान देऊन आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे, असे दुर्गाडे यांनी सांगितले.
या आहेत मागण्या…
प्राथमिक आरोग्य केंद्र, पंचायत समिती, जिल्हा मुख्यालय व जिल्हा परिषद केंद्रामध्ये आरोग्य सहायिका व आरोग्य सेविका यांची जादा पदे भरण्यात यावीत, पदोन्नती देताना रूजू दिनांकापासून देण्यात यावी. नर्सेसला त्रास देणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदा करावा, रिक्त पदे भरताना कंत्राटी आरोग्य सेविका, एनएचएम यांना प्राधान्याने सेवेत घ्यावे, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील आरोग्य सेविकांची कामांचे तास ठरवून द्यावे, कंत्राटी पद्धतीवर असलेल्या सेविकांना सेवेत रूजू करून घ्यावे, अशा विविध मागण्या संघटनेकडून करण्यात आल्या आहेत.